शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात नाशिक शहरात मार्च महिन्यापासून उच्चांकी संख्या असून, शहरात आता सतरा हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आधीच महापालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यात वैद्यकीय विभागात तर अधिकच अडचणी आहेत. तथापि, महापालिकेला केारोनाविषयी व्यापक लढा द्यावा लागत असल्याने बहुतांशी सर्वच स्टाफला कोरोनाशी संबंधित वेगवेगळी कामे करावी लागत आहेत; परंतु त्यातही कामचुकार कर्मचारी वर्गाकडून टाळाटाळ होत असल्याने आयुक्तांनी तंबी दिली आहे.
अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाही. तसेच सोपवण्यात आलेली कामे वेळेत करत नाहीत. किरकोळ आजाराचे निमित्त अर्ज देऊन रजा घेतात आणि विनापरवानगा निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असल्याचे आयुक्तांनी ३ एप्रिल राेजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आता कामे वेळेत करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर कार्यालयीन कामाच्या दिवशी कार्यालयीन काम वेळेत पूर्ण करताना शनिवार- रविवार आणि अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशी मुख्यालय सोडू नये तसेच कार्यालयप्रमुख आणि विभागप्रमुखांच्या आदेशानुसार सुटीच्या दिवशीदेखील कामावर येऊन काम करावे, असे आदेशात नमूद केले आहे.
इन्फो...
पन्नास नव्हे तर शंभर टक्के उपस्थिती
राज्य शासनाने शासकीय कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती आवश्यक केली असताना नाशिक महापालिकेत मात्र अशी सवलत तर नाहीच; परंतु शंभर टक्के उपस्थिती, शिवाय सुटीच्या दिवशी कामावर येण्याचे आदेश असल्याने अस्वस्थता आहे.