नाशिक - शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने आता महापालिकेने पुन्हा एकदा शहरात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सामान्यत: ही कारवाई आवश्यक असली तरी महापालिकेचे बहुतांश कर्मचारीच मास्क परिधान करीत नाही किंवा नावाला मास्क जवळ ठेवत असल्याचे लाेकमतच्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले आहेे.
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन सक्रिय झाले. जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर मास्क न लावणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारण्याऐवजी आता थेट १००० रुपये दंड म्हणजेच पाचपट दंड अधिक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी अधिसूचना जारी करून मनपा कर्मचारी, पेालीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना दंड वसुलीचे अधिकार दिले. त्यामुळे एकाच आठवड्यात सुमारे ९५० नागरिकांकडून साडेपाच लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. परंतु सर्वसामान्य नागरिकावर कारवाई करताना दुसरीकडे महापालिकेचे मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात इतकेच नव्हे तर क्षेत्रीयस्तरावर आलबेल असून कर्मचारी मास्कच परिधान करीत नसल्याचे आढळले आहे. मास्कने तोंड आणि नाक न झाकता केवळ तो शोभेसाठी गळ्यात ठेवून आपण महापालिकेचे कर्मचारी, आपल्यावर कोण कारवाई करणार, अशा आविर्भावात वागणाऱ्यांना महापालिका धडा केव्हा शिकविणार, असा प्रश्न केला जात आहे.
इन्फो..
५० टक्के कर्मचारी विनामास्क
महापालिकेच्या विविध कार्यालयात भेट दिल्यानंतर नागरिकांशी थेट संबंधित असलेले कर्मचारी मास्क वापरत असेल तर ते थेट काऊंटरवर असतानाच वापर करतात. अन्य कर्मचारी मास्क वापरतात, परंतु नावाला. अनेक जणांच्या गळात मास्क असतात. नगर रचना विभागात तर कर्मचारी सायंकाळी प्रचंड गर्दी असतानाही मास्कचा वापर फार करीत नसल्याचे आढळते.
कोट..
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे महापालिकेच्या वतीने नागरिकांवर कारवाई केली जात आहे. नागरिकांना दंड करतानाच महापालिका कर्मचाऱ्यांनीदेखील मास्क वापरणे आवश्यकच आहे. मास्क न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. आतापर्यंत सिडको, पंचवटी आणि मुख्यालयातील एकेक अशा तीन कर्मचाऱ्यांना दंड करण्यात आला आहे.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन
इन्फो..
साडेपाच लाख रुपयांचा दंड वसूल
९४७
एकूण कारवाया
५,३२.४००
दंड
९४७