नाशिक : महापालिका कोणत्याही परिस्थितीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविणारच असून, विकास आराखडा तयार करताना नगररचना योजनेचाही त्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी विकास आराखडा तयार करणारे उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे केली. दरम्यान, विकास आराखडा तयार करणे हा महापालिकेचा अधिकार असून, आमच्या हक्कावर गदा आणल्यास कायदेशीर हत्यार उपसणार असल्याचेही उपमहापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेत विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत उपमहापौर बग्गा यांनी नाशिक शहरात नगररचना योजना लागू करण्याची माहिती देताना सांगितले, शासनाने आता टीपी स्कीम आणलेली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकाही ही योजना राबविणारच आहे. परंतु विकास आराखडा तयार करताना त्यात टीपी स्कीम अंतर्भूत करण्यात यावी. त्यात रोडमॅपिंग आणि झोनिंग ठरवून द्यावे. टीपी स्कीम लागू झाल्यानंतर ५० टक्के क्षेत्र हे मनपाकडेच येणार आहे, त्यावर महापालिका आरक्षण टाकेन. लवकरच महासभेत टीपीचा ठराव करण्यात येईल. विकास आराखडा अंमलात आणण्याची क्षमता महापालिकेत नाही. विकास आराखडा तयार करताना उपसंचालकांनी रहिवासी क्षेत्र कमी करावे. ते ५० टक्केपेक्षा अधिक असता कामा नये. २०३५ साली किती लोकसंख्या असली पाहिजे, याचेही नियोजन झाले पाहिजे, असेही बग्गा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विकास आराखडा महासभेवर ठेवण्याची मागणीही बग्गा यांनी केली. मुळात विकास आराखडा तयार करण्यात मनपा कुचकामी ठरली होती, तर शासनाने कलम २६ खाली आराखडा प्रसिद्ध करू शकले असते. उपसंचालक भुक्ते यांचीही नियुक्ती बेकायदेशीरच आहे. मनपाच्या हक्कावर गदा आली म्हणून महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता मोहन रानडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. १२ मार्चला त्याची सुनावणी असून, महापालिकेतील महासभेच्या अधिकार व हक्कावर गदा आणल्यास आम्ही कायदेशीर हत्त्यार उपसणार असल्याचेही बग्गा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मनपा नगररचना योजना राबविणारच
By admin | Published: February 05, 2015 12:12 AM