नाशिक : महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत खासगी आस्थापनांमध्येही स्वच्छता दिसावी, यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत विविध गटांत हॉटेल ताज, एमईटी, अपोलो पार्क साइड, तसेच पारेषण केंद्र अशा आस्थापनांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.
विशेष म्हणजे, सहाही विभागांत असलेल्या आस्थापनांची पाहणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आणि त्यात या संस्थांमधील स्वच्छतेमुळे त्यांनी बाजी मारली आहे. १ ते २६ नाेव्हेंबर, २०२० या कालावधीत स्वच्छतेविषयी जनजागृती करून, त्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आले. यात अनेक आस्थापनांनी महापालिकेने आखून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाची पाहणी केली असून, त्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमाकांच्या आस्थापनांची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारची निवड करण्यासाठी आयुक्तांनी खास समिती नियुक्त केली हेाती. त्यांच्या अहवालानुसार, ही निवड करण्यात आली आहे.
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार हॉटेल प्रकारात प्रथम क्रमांक एक्स्प्रेस इन, तृतीय एसएसके, शिक्षण विभागाच्या गटात प्रथमच एमईटी स्कूल ऑफ फार्मसी, द्वितीय-सिम्बॉयसिस हायस्कूल, तृतीय मनपा शाळा अंबडगाव, रुग्णालय गटात अपोलो हॉस्पिटल प्रथम अशोका मेडिकव्हरने द्वितीय तर एचसीजी मानवता सेंटतर तृतीय क्रमांक पटकावला. रहिवासी विभाग गटात पार्कसाइडने प्रथम, तर सम्राट ट्रॉपीकॅनाने द्वितीय क्रमांक मिळविला.
शासकीय संस्था गटात प्रथम क्रमांक विद्युत पारेषण केंद्र, जेल रोडने प्रथम, नाशिक विभागीय पालिका कार्यालय, तर तृतीय क्रमांक नाशिकच्या विभागीय आयुक्तालयाने पटकावला. बाजारपेठ विभागात सिटी सेंट्रल मॉलने प्रथम, शॉपर स्टॉपने द्वितीय तर परफेक्ट डाळिंब मार्केटने तृतीय क्रमांक पटकावला.