नाशिक : मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची घटत चाललेली संख्या, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढत चाललेला दप्तराचा बोजा या साऱ्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अर्चना जाधव यांनी मनपा शाळा एक दिवस दप्तराविना भरविण्याची सूचना शिक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.अर्चना जाधव यांनी प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी तसेच गुणवत्तेत वाढ व्हावी याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्याची पालकांची मानसिकता व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची घटत चाललेली उपस्थिती यात सुवर्णमध्य साधण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढता अभ्यासक्रम, विषय पुस्तके, गृहपाठ यातच विद्यार्थ्याचा वेळ जातो. शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने विद्यार्थी सांभाळणेही अवघड बनले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होत चालली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि गुणवत्तेवरही दिसून येत आहे. त्यामुळे मनपाच्या शाळा एक दिवस दप्तराविना भरवाव्यात. त्यादिवशी शाळेत संगीत, बौद्धिक खेळ, गाणे-गप्पा-गोष्टी, मैदानी खेळ, संवाद-चर्चासत्रे, योगासने, चित्रकला, हस्तकला आदि उपक्रम राबविण्यात यावेत. त्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताणही हलका होऊन विद्यार्थ्यांच्याही अंगभूत गुणांना वाव मिळू शकेल. सदरचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या सभेत ठेवण्याची विनंतीही जाधव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
महापालिका शाळा एक दिवस दप्तराविना
By admin | Published: September 02, 2016 11:03 PM