नाशिक : गेल्या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळा आता दुपारच्या सत्रात पूर्वीप्रमाणेच करण्याचा मनोदय शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (दि.९) होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या ९० प्राथमिक शाळा असून, सुमारे ३० हजार विद्यार्थी आहेत, तर एक हजाराच्या आसपास शिक्षक आहेत. या शाळांपैकी काही शाळा सकाळच्या सत्रात भरत होत्या, तर काही शाळा दुपारच्या सत्रात भरत होत्या यासंदर्भात शिक्षण विभागाचे माजी प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सर्वच शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार सकाळच्या सत्रात शाळा भरत आहेत. परंतु त्याचा दुसरा नकारात्मक परिणामदेखील दिसून येत आहेत.काही ठिकाणी शिक्षकांचा विरोध असला तरी परिस्थती बघून किमान काही भागांतील शाळांच्या वेळा बदलता येतील, असे सभापती सोनवणे यांनी सांगितले. येत्या बुधवारी (दि.९) शिक्षण समितीची पहिली बैठक होणार आहे. त्यात हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता आहे.शाळा एकत्रिकरणाने वाढल्या समस्यामहापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या १२८ शाळांमधील काही शाळा एकत्र तर काही सुसूत्रीकरण करून ९० शाळा आता तयार केल्या आहेत, परंतु एकत्रीकरणामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या अधिक झाली आहेत आणि त्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवरदेखील काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.शाळा या झोपडपट्टी क्षेत्रातमहापालिकेच्या बहुतांशी शाळा या झोपडपट्टी क्षेत्रात आहेत. तेथील मुलांचे पालक हे मोलमजुरीला गेल्यानंतर सायंकाळीच घरी येतात. सकाळच्या सत्रातील मुले दुपारी १२ वाजता घरी आल्यानंतर सायंकाळपर्यंत त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे मुक्त असलेल्या या मुलांना वेगळे वळण लागण्याची शक्यता असते. शिक्षण मंडळाच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे या फुलेनगर परिसराचे प्रतिनिधित्व करीत आहे.
महापालिकेच्या शाळांच्या वेळा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:24 AM