त्र्यंबकेश्वर : मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीकडे जाणाऱ्या रोडसंदर्भात नगरसेवक स्वप्नील (पप्पू) शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजय जाधव यांची मुस्लीमबांधवांनी भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर रस्ता कचऱ्यापासून वेगळा करावा व स्वच्छ करून द्यावा, अशी मागणी शेलार यांनी केली. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर शहरातील मुस्लीम बांधवांच्या कब्रस्तान (दफनभूमी)कडे जाणारा रस्ता मुळातच पालिकेच्या डम्पिंगमधून जातो. दररोज गावातील ओला, सुका कचरा सर्व प्रकारच्या घाणीने बरबटलेला आहे. यासाठी हा संपूर्ण रस्ता कचराविरहित व स्वच्छ असावा, अशी मागणी शिष्टमंडळाने पालिकेला एका निवेदनाद्वारे केली आहे. दफनभूमीत पावसाळ्यात जाताना चिखल तुडवत जावे लागते, तर एरवी कचऱ्यातून जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना निवेदनाच्या प्रती देऊन आपली कैफियत मांडली आहे. या निवेदनावर नगरसेवक स्वप्नील (पप्पू) शेलार, मुदस्सर अत्तार, सकलेन मणियार, साहिल मणियार, जमीर अत्तार, अल्फेज अत्तार, सोनूखान तन्वीर, अत्तार सलमान, मणियार सैफ अली खान, अतिक अत्तार सुफियाँ यांची सही आहे. यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दखल घेऊन संबंधितांना आदेश देऊन रस्ता व परिसर स्वच्छ करण्याचा आदेश दिला.