लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सात नगरपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केली आहे. आता फक्त ग्रामीण भागावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, येवला, भगूर व त्र्यंबकेश्वर या नगरपालिका तसेच सुरगाणा, पेठ, देवळा, चांदवड, निफाड, कळवण, दिंडोरी या नगरपंचायतींमध्ये गेल्या वर्षापासूनच स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्तीसाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वच्छतागृह बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यासाठी सन-२०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. जनगणनेंतर्गत प्रत्येक कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती घेण्यात आली असता त्यात ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली होती व त्याच्या आधारे ज्या कुटुंबात शौचालय नाही अशांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली तसेच त्यांना प्रत्येकी सतरा हजार रुपये शौचालय बांधणीसाठी अनुदान देण्यात आले. प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी याकामी पुढाकार घेत शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. या संदर्भातील माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला देण्यात आली व त्यानुसार गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती हगणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.
नगरपालिका, नगरपंचायती हगणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 5:05 PM