ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप
नाशिक : महापालिकेच्या नियमित सेवेतील सफाई कामगार काेरोनाकाळात जोखीम पत्करून या आजारासंदर्भातील सर्व कामे करीत आहेत. मग आऊटसोर्सिंगच्या ठेकेदाराकडील सफाई कामगारांकडून अशाप्रकारची कामे करून का घेतली जात नाही, असा प्रश्न सफाई कामगार विकास युनियनने केला आहे. त्याच बरोबर महापालिका ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप सुरेश मारू व सुरेश दलोड यांनी केला आहे. महापालिकेने पूर्व आणि पश्चिम या दोन विभागासाठी आऊटसोर्सिंगव्दारे सफाई कामगार नियुक्त केले आहेत. मात्र, या दोन विभागातील कोविड सेंटरमध्ये कायम सफाई कामगारांना पाठवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
---
कॉलेजरोड परिसरातील पथदीप बंद
नाशिक : महापालिकेने शहरात स्मार्ट लाइट बसवले आहेत. मात्र कॉलेजरोडवरील बहुतांशी पथदीप बंदच असतात. त्यामुळे नवीन पथदीप बसवून काय उपयोग झाला, असा प्रश्न केला जात आहे. सुमारे ७० हजार दिवे महापालिकेने बसवले आहेत. कॉलेजरोडवर प्रायोगिक तत्त्वावर दिवे बसविण्यात आले होते. मात्र, शरणपूर सिग्नल ते बिग बाजार कधी, बीवायके कॉलेज ते मॉडेल कॉलनी या दरम्यान पथदीप बंद असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
---
गावठाण क्लस्टर अजूनही कागदावरच
नाशिक : महापालिकेचे गावठाण क्लस्टर राज्य शासनाने मान्य न केल्याने यंदाही धोकादायक वाड्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. गावठाण भागात गेल्यावर्षीही सुमारे पाचशे धोकादायक घरांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर युनिफइड डीसीपीआर मंजूर झाले असले तरी गावठाण क्लस्टर अद्यापही मंजूर झालेले नाही.
----
ऑनलाइन बैठका घेण्याचे आदेश
नाशिक : कोरोना संसर्ग मर्यादित ठेवण्यासाठी महापालिका आणि नगरपालिकांच्या सर्व बैठका अत्यावश्यक असतील तर त्या ऑनलाइनद्वारेच घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. नगरविकास खात्याने यांसदर्भात ६ मे राेजी पत्र काढले असून, त्यात बैठका ऑनलाइन घेण्याचे सूचित केले आहे.
----
ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या सूचना
नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा विचार करून महापालिकेने बालकांची दक्षता घेण्याची तयारी सुरू केली आहे. ज्या खासगी बालरुग्णालयात पन्नास खाटा असतील त्यांना ऑक्सिजननिर्मिती प्लांट सक्तीचा केला आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात रुग्णालयांना सूचित केले आहे.
-----
रेमडेसिविरचा साठा संपल्याने गैरसोय
नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात रेमडेसिविरचा साठा संपल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. महापालिकेने सुमारे वीस हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. मात्र पुरवठादार कंपनीकडून इंजेक्शन्स मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे.
-------
सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा ऑनलाइन
नाशिक : शहरातील सांस्कृतिक कार्यक्र\म कोरोनामुळे ठप्प झाले आहेत. शासनाने सार्वजनिक कार्यक्र\म बंद केल्याने नाट्यगृहे ओस पडली आहेत. दरम्यान सांस्कृतिक संस्थांनी आता ऑनलाइन कार्यक्र\म सुरू केले आहेत. अलीकडेच वसंत व्याख्यानमाला ऑनलाइन सुरू झाली आहे. अशाच प्रकारे आता कविसंमेलन आणि अन्य कार्यक्रमदेखील ऑनलाइन होत आहेत.
-------