मुंजवाड : येथे सोमवारी पहाटे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.येथील मध्यवस्तीत असलेल्या बंद घरांची कुलापे तोडून शिक्षक रवींद्र जाधव, माजी पोलीसपाटील तुकाराम जाधव, श्रीमती इंदूबाई जाधव, जिभाऊ देवरे, उद्धव कुलकर्णी यांच्या घरातील चोरीचा धाडसी प्रयत्न झाला. त्यात रवींद्र जाधव यांच्या घरातून कांदा विक्रीचे एक लाख तीन हजार रुपये रोख, पाच तोळ्याची सोन्याची पोत, पाच तोळ्याच्या बांगड्या, चार तोळ्याची सोन्याची चैन, चार तोळ्यांच्या अंगठ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. इंदूबाई जाधव यांच्या कपाटातील ३० हजार रुपये रोख व सात ग्रॅमची अंगठी चोरून नेले तर उद्धव कुलकर्णी व तुकाराम जाधव यांच्या पत्नी बाहेर गावी गेल्याने त्यांच्याकडे काय चोरीस गेले याची माहिती मिळू शकली नाही. देवरे यांच्याकडेही चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. गावात प्रथमच एकाचवेळी पाच घरांमध्ये धाडसी चोरी झाल्याने दहशत पसरली आहे. घटनास्थळी नाशिकहून दुपारी तीन वाजता श्वान पथक आले. श्वानाने महादेव मंदिरापर्यंतचा माग दाखविला. नाशिकचे ठसे तज्ज्ञ ए. बी. निकम यांनी घटनास्थळाचे ठसे घेतले. दरम्यान रवींद्र जाधव, उद्धव कुलकर्णी, इंदूबाई जाधव, तुकाराम जाधव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी अरेरावीची भाषा वापरून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी ग्रामस्थांची समजूत घालून बैठक घेतली. त्यामुळे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)
मुंजवाडला घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
By admin | Published: November 30, 2015 11:46 PM