आर्टिलरी सेंटर रोड सुवर्ण सोसायटी केशवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सागर प्रदीप जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या बिल्डिंगमध्ये चुलतभाऊ प्रशांत नानासाहेब जाधव हा त्याच्या आई व बहिणीसह राहतो. माझे दिवंगत चुलते नानासाहेब जाधव व दिवंगत शिरीष लवटे यांच्यात पूर्वीपासून वैमनस्य होते. २०१६ मध्ये लवटे यांच्या वाहनचालकाच्या खुनाच्या केसमध्ये माझा चुलतभाऊ प्रशांत हे संशयित होते. त्यांची या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली आहे. पूर्ववैमनस्य व त्या केसमधून निर्दोष सुटल्याचा राग मनात धरून गेल्या ७ मे रोजी रोशन विश्वास लवटे व त्याचे इतर साथीदार आमच्या बिल्डिंगखाली आले. प्रशांतला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आमच्या बिल्डिंगमध्ये संशयित गिरीश लवटे, संदेश लवटे, रोशन लवटे, धनंजय सोळंखे, कार्तिक सोनी, गजानन बावणे (सर्व रा. देवळालीगाव) हे आले. त्यांच्या हातात कोयते होते. ते चुलत भाऊ प्रशांत जाधव याला शिवीगाळ करून त्याचा शोध घेत होते. सदर प्रकार लक्षात येताच सागर याने तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता गिरीश लवटे, कार्तिक सोनी, गजानन बावणे हे आय टेन या चारचाकीसह (एमएच १२ एफएफ ३००८) इतर तिघे जण ॲक्टिव्हा दुचाकीवरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी आय टेन गाडीचा पाठलाग करून गिरीश लवटे, कार्तिक सोनी, गजानन बावणे यांना पकडले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवकाच्या मुलाविरुद्ध जीवे मारण्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:14 AM