येवला : शहरालगत असलेल्या अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत परप्रांतीय मजूराचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अंगणगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लॉट क्रमांक ८ मधील सिमेंट टाईल्स बनविणार्या कारखान्यात बाबूलाल काशी रावत (४०, रा. फिरोजपुर रुईखेडा, ता. सफिपुर जिल्हा उनाव, उत्तर प्रदेश) मजूर म्हणून काम करत होता. बाबुलाल दारू पिऊन राहुल कुमार रावत (२२, रा. फिरोजपुर रुईखेडा, तालुका सफिपुर, जिल्हा उनाव, उत्तर प्रदेश) यास कामे सांगून त्रास द्यायचा. या कारणावरून राहुल याने रविवारी, (दि. २१) रात्री बाबुलाल याचे डोके भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबला. यात बाबूलाल याचा मृत्यू झाला. राहुल याने स्वतः पोलिसांना बाबुलालचा झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनस्थळाची पाहणी करून कसून तपास केला. पोलिसांनी चौकशीची सुत्रे वेगाने फिरवली. अवघ्या पाच तासाच्या तपासात बाबूलाल यांचा राहुल याने खुन केल्याचा संशय दाट झाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले .
दरम्यान, या प्रकरणी राहुल कुमार रावत याचे विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक युवराज चव्हाण , पोलीस हवालदार सचिन राऊत यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास केला.