सिडकोमधील मित्रांना अटक : २००८ साली चंदनापुरी घाटात आढळला होता मृतदेह
नाशिक : पुणे रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केला. सिडको येथील मित्रांना पोलिसांनी अटक करून शनिवारी (दि. १४) संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे. गुन्ह्यातील संशयिताने मयत तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार नाशिकचे प्रतीक राजेंद्र धरणे (मूळ रा. सिडको) व विनित पुंडलिक झाल्टे (३०, साईसमर्थ रो-हाउस, दत्त चौक, सिडको) हे दोघे मित्र पुण्यात एका सदनिकेत राहात होते. प्रतीकचे हडपसर येथील रहिवासी असलेल्या अर्चना सोनवणे नावाच्या युवतीशी प्रेमसंबंध होते. त्याने अर्चनाला पळवून नेत आळंदीला विवाह केला होता. विवाहनंतर तो अर्चनासोबत आणि मित्र विनित आणि त्याचा मामा चंद्रकांत माधवराव पिंपळसकर (३५, रा.हडपसर) असे हे चौघे एकाच सदनिकेत वास्तव्यास होते. दरम्यान, विनित आणि अर्चनाचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रतीक आणि अर्चनामध्ये वादविवाद झाला. दरम्यान, हे तिघे अर्चनाला घेऊन नाशिककडे निघाले असता चंदनापुरी घाटात थांबले. यावेळी तिघांपैकी एकाने अथवा तिघांनी मिळून अर्चनाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण प्रतीक आणि विनित दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर दोघांनी एकमेकांवर अर्चनाचा खून केल्याचा आरोप केल्याची माहिती सहायक आयुुुक्त अशोक नखाते यांनी दिली. गुन्ह्णात नेमका कोणाचा सहभाग आहे की तिघांनी मिळून कट रचला? या दिशेने संगमनेर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. शनिवारी (दि.१४) गुन्हे शाखेने सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून दोघा संशयित आरोपींना संगमनेर पोलिसांच्या हवाली केले आहे.प्रतीक निघाला मोटारसायकल चोरउपनगर परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलींचा शोध घेताना पोलीस नाईक संजय गामणे यांना गुप्त बातमीदाराकडून प्रतीकची माहिती मिळाली. प्रतीक हा शिर्डीमध्ये एका रेस्टॉरंटचा व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होता. यावेळी गामणे यांनी वरिष्ठ अधिकाºयांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. स्वतंत्र पथक शिर्डीकडे रवाना झाले. तेथून प्रतीकच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर यापूर्वीही दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.आई-वडिलांसह कुटुंबीय अनभिज्ञ२००८ सालापूर्वी प्रतीक नावाच्या मुलासोबत आपल्या मुलीने विवाह केला आणि ती नाशिकमध्ये आनंदाने नांदत आहे, असा समज मयत अर्चनाच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांचा होता; मात्र हा त्यांचा गैरसमज ठरला. आठ वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलीची संबंधितांनी हत्या केल्याचे उघड झाले असून, याबाबत कुटुंबीयांना कुठलीही माहिती नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.दुचाकीच्या गुन्ह्णात अटक अन् हत्येचा गुन्हा उघडनाशिकच्या गुन्हे शाखेला हडपसरच्या रहिवासी युवतीच्या हत्येबाबत कुठलीही माहिती अथवा सुगावा नव्हता; दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी शिर्डी येथून प्रतीकच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता विनित नावाच्या माझ्या मित्राने २००८ साली माझी प्रेयसी व पत्नी अर्चनाची हत्या चंदनापुरी घाटात केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विनितला ताब्यात घेतले; मात्र त्याने हत्येचा आरोप प्रतीकवर केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.उपनगर परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलींचा शोध घेताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून प्रतीकची माहिती मिळाली. प्रतीक हा शिर्डीमध्ये एका रेस्टॉरंटचा व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होता. स्वतंत्र पथक शिर्डीकडे रवाना झाले. तेथून प्रतीकच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर यापूर्वीही दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.