मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता रमजानपुरा भागातील आमिन मौलाना दर्गा चौकातील जावीद मीलन हॉटेलसमोर ही घटना घडली होती. शेख अबरार शेख सलीम (रा. हैदर अली चौक, रमजानपुरा) याचे पान दुकान असून, गुटखा व इतर सामानाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने याच भागातील जमाल अंजुम मोहम्मद अय्युब, बिलाल अहमद मोहम्मद अय्युब व मोहम्मद अय्युब उर्फ जल्ला (रा. फातमा मशीदजवळ, रमजानपुरा ) यांनी अबरारवर तलवार व धारदार शस्त्राने डोक्यात, छातीवर जबर मारहाण केल्याने अबरार जागीच गतप्राण झाला.
घटनेची माहिती मिळताच रमजानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व कर्मचाऱ्यांची धाव घेतली. घटनास्थळ मोठ्या वर्दळीचे ठिकाण असल्याने काही वेळातच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी लता दोंदे यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांच्या शोधार्थ मार्गदर्शनपर सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास बिलाल अहमद मोहम्मद अय्युब यास ताब्यात घेत अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या अध्यक्षतेखाली अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात करीत आहेत.
चौकट
पूर्ववैमनस्यातून घटना?
गुटख्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने या क्षुल्लक कारणावरून खून करण्यात आला असला तरी पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, अशी चर्चा आहे. अबरार व संशयितांमध्ये मागील चार-पाच वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणातून खुन्नस होती. त्यातूनच अबरारची हत्या करण्यात आली असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होत आहे.