ओझरटाऊनशिप : दारू पिण्यावरून टोकल्याने एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने एकाच्या डोक्यावर हत्याराने वार करत जीवे ठार मारण्याची घटना निफाड तालुक्यातील ओणे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.महिनाभरापूर्वी वेताळबाबा रोड रा. ओणे येथे राहाणाऱ्या एका अल्पवयीन १४ वर्षीय मुलाने दारू पित त्याची आजी व तसेच देवराम लक्ष्मण शेखरे (वय ४८) रा. हरणगांव, ता.पेठ (हल्ली रा. वेताळबाबा रोड, ओणे) यांना शिवीगाळ केली होती. त्यावेळी तू दारू पित जावू नको, नाहीतरी वाया जाईल असे देवराम शेखरे यांनी त्यास समजावून सांगितले होते. त्याचा राग मनात ठेवून या मुलाने बुधवारी (दि.२०) मध्यरात्रीनंतर देवराम शेखरे हे जेवण करून फिरत असतांना त्यांना वेताळबाबा चौफुली ते चांदोरी रोडवर एकटे गाठून त्यांच्या डोक्यावर टणक हत्याराने मारून गंभीर जखमी केले. त्यात शेखरे यांचा मृत्यू झाला. याशिवाय या मुलाने शेखरे यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी विमलबाई यांनाही शिवीगाळ करत तिच्याही डोक्यात वार करत तिला जखमी केले. या घटनेनंतर विमलबाई शेखरे यांनी ओझर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी अरु ंधती राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत ओझर पोलिसांना सूचना दिल्या . अधिक तपास पोलिस निरिक्षक भगवान मथुरे करीत आहेत.
दारू पिण्यावरून टोकल्याने अल्पवयीन मुलाकडून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:46 PM