नाशिक : शहरातील भारतनगर भागात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने थेट भाडेकरू महिलेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पिडित महिलेने मृत्यूपुर्वी दिलेल्या जबाबाने गुरूवारी (दि.२) समोर आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी घरमालकासह त्याच्या संशयित साथीदारांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांचे जबाब हे महिलेच्या जबाबाच्याविरूध्द असल्याने आता भाडेकरू महिलेचा भाजून झालेला मृत्यू हा खून की आत्महत्त्या याबाबत पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे.वडाळारोडवरील भारतनगर भागात राहणाऱ्या आयेशा असीम शेख ( १८) या महिलेला भाजलेल्या गंभीर अवस्थेत मंगळवारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बुधवारी (दि.१) आयेशाचा मृत्यू झाला. तत्पुर्वी कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांनी महिलेचा जबाब घेतला. जबाबानुसार मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संशयित बब्बू (पूर्ण नाव नाही), अश्पाक शेख (३२, रा. शिवाजीवाडी), राणी व अमन (पूर्ण नावे नाहीत) यांनी घरभाडे दिले नाही म्हणून रॉकेल ओतून पेटवून दिले, असे म्हटले आहे. या जबाबानुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरमालकासह चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी संशयित अश्पाक व शाहिस्ता उर्फराणी शेख या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने शुक्र वारपर्यंत (दि.३) पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, पोलीस तपासात परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार अणि मयत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार आयेशाने स्वत:च अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचे समोर येत आहे. घटनेच्या दिवशी महिलेचे तिच्या पतीसोबत वाद झाले. त्यावेळी घरमालक तेथे आला, त्याचवेळी तिने स्वत:स पेटवून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.खूनाचा गुन्हा; मात्र साशंकता कायममृत्यूपुर्व जबाबात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने पेटविल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सुरूवातीला संशयितांविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला; मात्र बुधवारी जळीत महिलेलाच मृत्यू झाल्याने या गुन्ह्याचे रूपांतर खूनाच्या गुन्ह्यात करण्यात आले; मात्र अद्यापही पोलिसांसमोर महिलेचा मृत्यू की आत्महत्त्या याबाबचा निर्माण झालेला पेच कायम आहे.
पोलिसांपुढे पेच : ‘त्या’ भाडेकरू महिलेचा खून की आत्महत्त्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 8:26 PM
वडाळारोडवरील भारतनगर भागात राहणाऱ्या आयेशा असीम शेख ( १८) या महिलेला भाजलेल्या गंभीर अवस्थेत मंगळवारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, बुधवारी (दि.१) आयेशाचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देजबाब अन् परिस्थितीजन्य पुरावे एकमेकांविरूध्द