घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारी घाटात सोमवारी(दि.१३) एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ही घटना घात की अपघात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावण्यास घोटी पोलिसांना यश आले असून नात्यातीलच इसमाने अनैतिक संबंधातून ‘त्या’ महिलेला सात दिवसांपूर्वी मोटारसायकलवर नेऊन बारी घाटात डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास जेरबंद केले आहे.सोमवारी (दि.१३) सकाळी वासाळी जवळील बारी घाटात २० फुटावर एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मात्र या महिलेची ओळख पटविण्यास अनेक अडचणी होत्या. घटनास्थळी आढळलेल्या स्टीलचा डबा, तपकिर व ओढणी या पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत होता. अखेर पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे यांनी या महिलेची ओळख पटविण्यास स्टीलच्या डब्याचा आधार घेतला. त्यातून ओळख पटविण्यास यश आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वासाळी परिसरातील बारशिंगवे भोईरवाडी येथील महिला शोभा शिवाजी शिंदे ही ७ आॅगस्ट २०१८ रोजी टाकेद येथे कामावर गेली होती. सोबत जेवणाचा डबा होता. ती परत न आल्याने तिचा शोध घेणे सुरूच होते. स्टीलच्या डब्याच्या आधारे या महिलेची ओळख पटल्याने पोलिसांनी तपासाला गती देत संशियत आरोपीचा शोध घेतला. अखेर आठ तासात घोटी पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून भोईरवाडी गावातीलच शिवाजी मंगळू भोईर (वय ४०) यास ताब्यात घेऊन अटक केली. मृत महिला शोभा शिंदे ही संशयित शिवाजी मंगळू भोईर याची नात्याने चुलत आत्या होती. दरम्यान पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी घोटी पोलिस ठाण्यात येऊन घटना व तपास कामाचा आढावा घेऊन उपयुक्त सूचना केल्या. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस कर्मचारी अनिल धुमसे, संतोष दोंदे, शीतल गायकवाड, प्रकाश कासार,गणेश सोनवणे,कृष्णा कोकाटे आदी करीत आहेत.
बारी घाटात अनैतिक संबंधातून महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 6:04 PM
संशयितास अटक : स्टीलच्या डब्यामुळे महिलेची पटली ओळख
ठळक मुद्देसोमवारी (दि.१३) सकाळी वासाळी जवळील बारी घाटात २० फुटावर एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी आढळलेल्या स्टीलचा डबा, तपकिर व ओढणी या पुराव्यांच्या आधारे तपास