सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट असलेल्या रतन इंडियाच्या मालकीच्या औष्णिक वीज केंद्राच्या मालमत्तेवर कर आकारणी करण्यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, त्यासंदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे यांच्यासह सरपंच रूपाली पिंपळे, उपसरपंच अनिल सिरसाट, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बाविस्कर यांच्या सहीनिशी यासंदर्भात रतन इंडियाचे प्रकल्प प्रमुख कर्नल लोकेश सिंग, एच.आर. हेड शिरीष महापात्रा यांना भेटून पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालयाच्या ३१ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीतील रतन इंडिया कंपनीच्या मालमत्तेवर कर आकारणी करावयाची असून, जमिनीचे क्षेत्रफळ, इमारतीचे क्षेत्रफळ व वापरानुसार बांधकामाचा प्रकार, इमारतीचे भांडवली मूल्य, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना क्रमांक २८६ दि. ३१ डिसेंबर २०१५ प्रमाणे अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणित बखळ जागा व वापर आदी माहिती नकाशासह सात दिवसांच्या आत ग्रामपंचायतीला देण्यात यावी. माहिती न दिल्यास ग्रामपंचायतमार्फत मोजमाप करून कर आकारणी करण्यात येईल. ती कंपनीवर बंधनकारक राहील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठोक, सचिन सिरसाट, रवींद्र शिंदे, क्लार्क कांबळे आदी उपस्थित होते.
इन्फो...
प्रकल्पग्रस्तांवर अन्याय नको
औष्णिक प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची हमी संबंधित कंपनीने दिली होती. मात्र, आता त्यांना नोकरीवरून कमी करण्याचा घाट घातला जात आहे, तसेच प्रकल्पग्रस्तांना १५ टक्के भूखंड परतावा देण्याचे कबूल करून १० वर्षे उलटूनही तो न मिळाल्याचा जाब उपसरपंच अनिल सिरसाट यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला. प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून नोकरीत प्रकल्पग्रस्तांना डावलले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
फोटो - ०४ सिन्नर १
रतन इंडियाचे प्रकल्प प्रमुख कर्नल लोकेश सिंग, एच.आर. हेड शिरीष महापात्रा यांना कर आकारणीसंदर्भात निवेदन देताना मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बाविस्कर आदी.
040921\04nsk_30_04092021_13.jpg
रतन इंडियाचे प्रकल्प प्रमुख कर्नल लोकेश सिंग, एच.आर. हेड शिरीष महापात्रा यांना कर आकारणीसंदर्भात निवेदन देताना मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बाविस्कर आदी.