भगूर : कौसल्याराणी हळू उघडी लोचनेदीपून जाय माय स्वत: पुत्रदर्शनेओघळले आसू सुखे कंठ दाटला....राम जन्मला गं सखे राम जन्मला...श्री रामावीण मज दुसरा छंद नसावा, प्रभो मज एकच वर द्यावा.. अशा रामकथेतील विविध प्रसंगांतील वैविध्यपूर्ण गाणी तालासुरात सादर करीत बागेश्रीच्या कलाकारांनी रामभक्तांना आनंद मिळवून दिला.भगूर येथील प्राचीन राममंदिरात चारूदत्त दीक्षित यांचा बागेश्रीनिर्मित ‘संगीत अयोध्येचा राजा’ हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. जय जय हे रघुनंदन दीक्षितांनी रचलेल्या श्रीरामाच्या स्तवनाने मैफलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर स्वयें श्री रामप्रभू ऐकती, राम जन्मला गं सखे, नकोस नौके परत फिरू, सावळा गं रामचंद्र, राम का गुणगान, विजय पताका.. यांसारखी भावमधुर गाणी गायिका सावनी कुलकर्णी, शीला दंडवते यांनी सादर केली.दीपक दीक्षित व मृण्मयी कापसे यांनी सहगायन केले. विविध गीतांना चारूदत्त दीक्षित (संवादिनी), वैभव काळे (तबला), दीपक दीक्षित (तालवाद्ये) यांनी संगीतसाथ केली.मारुती भजनी मंडळाच्या गायक कलाकारांनी वीर हनुमानाची गाणी दमदार आवाजात सादर केली. या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. याप्रसंगी एकनाथ शेटे, रामदास आंबेकर, डॉ. मृत्युंजय कापसे यांसह परिसरातील रामभक्त, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘संगीत अयोध्येचा राजा’ मैफलीत रामभक्त तल्लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:40 AM