नाशिक : मधुआनंद व शंकराचार्य न्यास, सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ पासून दोन दिवसीय संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जुना गंगापूर नाका येथील शंकराचार्य संकुलाच्या डॉ. कूर्तकोटी सभागृहात सदर कार्यक्रम होणार आहे.मधुआनंद संस्थेतर्फे ज्येष्ठ गायिका मंजिरी असनारे-केळकर या आपले गुरू पंडित मधुसुदन कानेटकर आणि पंडित आनंद असनारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीतोत्सवात शास्त्रीय गायन करणार आहेत. मंजिरी असनारे या जयपूर घराण्याच्या गानपरंपरेतील प्रसिद्ध गायिका आहेत. पंडित मधुसूदन कानेटकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मधुआनंद व शंकराचार्य न्यास, सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १९) संध्याकाळी ६ वाजता मंजिरी असनारे-केळकर या स्वरांजली वाहतील. त्यांना संवादिनीवर राहुल गोळे व तबल्यावर श्रीकांत भाले यांची साथ असेल. महोत्सवातील दुसऱ्या सत्रात रविवारी (दि. २०) सकाळी ९ वाजता कोलकाता येथील प्रसिद्ध सरोदवादक पंडित पार्थो सारथी यांचे सरोदवादन होईल. पंडित पार्थो सारथी हे सेनिया मैहर घराण्यातील प्रसिद्ध सरोदवादक आहेत. या महोत्सवास सर्व रसिकांना मुक्त प्रवेश असेल, असे आयोजकांनी कळविले आहे.
मधुआनंद, शंकराचार्य न्यासतर्फे संगीतोत्सव
By admin | Published: December 17, 2015 12:31 AM