मनमाड : येथील येवला रोडवरील कॅम्प विभागातील जुने धार्मिक स्थळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून मनमाड पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविले. न्यायालयाच्या निर्णयाला विरोध नसला तरी पालिका प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीच्या चुकीच्या पद्धतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने मंगळवारी मनमाड बंदची हाक देण्यात आली होती. या कारवाई विरोधात शहरातून मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.येथील येवला रोडवरील धार्मिक स्थळ काढण्याची कारवाई पालिका प्रशासन, तहसीलदार, शहर पोलीस, रेल्वे पोलीस यांच्या प्रचंड बंदोबस्तात करण्यात आली. सदरचे स्थळ हटवताना कुठल्याही प्रकारे धार्मिक विधी व सोपस्कार न करता भावना दुखावल्या जातील, अशी कारवाई केली असल्याची तक्रार मुख्याधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या विरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने मंगळवारी मनमाड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प होऊन शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. येथील जामा मशिदीपासून काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चाचा समारोप एकात्मता चौकात करण्यात आला. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काजी असलम मौलाना, हाजी शब्बीर साहब, अॅड. मिर कासीम अली, मौलाना सहीद, मौलाना कमरुद्दीन, मौलाना मुजम्मील, अलताफ खान, जाफर मिर्झा, जुबेर शेख, अकील शेख, सय्यद एयाज, सय्यद कयाम यांच्यासह असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होेते. (वार्ताहर)
मुस्लीम बांधवांचा मूक मोर्चा
By admin | Published: March 07, 2017 11:25 PM