जुने नाशिक : येथील मुस्लीम समुदायाच्या सुन्नी मरकजी सिरत कमिटीच्या वतीने अल कायदा या दहशतवादी संघटनेचा तीव्र्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. संघटनेचा मुखिया अल जवाहिरी याने गेल्या गुरुवारी यू ट्यूबवरून प्रसारित केलेल्या व्हिडीओमधून भारतात या दहशतवादी संघटनेची शाखा सुरू करण्याची घोषणा केल्याने देशभरात ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. जवाहिरीच्या घोषणेचा शहरातील मुस्लीम समुदायाने निषेध केला असून, या संघटनेवर सरकारने तत्काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निषेधपत्रकात करण्यात आली आहे.‘अल कायदा’ संघटनेचा प्रमुख अल जवाहिरीच्या आवाजातील ५५ मिनिटांच्या इंटरनेटवरील व्हिडीओमध्ये भारतात पाय रोवण्याची धमकी देण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या सदर व्हिडीओमुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, देशासह राज्यांमधील सरकार आणि गुप्तचर संस्थांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अल कायदा’चे कोणतेही मनसुबे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतामध्ये मुस्लीम समुदाय यशस्वी होऊ देणार नाही, देशविरोधी कुठलेही षडयंत्र जवाहिरी भारतात रचू शकत नाही कारण भारताची ताकद विविधतेतील एकता असल्याचे शहरातील मुस्लीम सिरत समितीने निषेध पत्रकात म्हटले आहे. दुपारी भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्तांना शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-काझी मोईजोद्दीन सय्यद, हाजी मीर मुख्तार अशरफी यांच्यासह विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत निषेध पत्रक देण्यात आले. (वार्ताहर)
‘अल कायदा’च्या घोषणेचा मुस्लीम समाजाकडून निषेध
By admin | Published: September 06, 2014 11:01 PM