नाशिक : केंद्र सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आलेल्या तीहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हास्तरीय मुस्लीम समाज एकवटला आहे. शरियत बचाव कृती समिती गठीत करण्यात आली असून या कमिटीच्या नेतृत्वाखाली आज दुपारी अडीच वाजता जुने नाशिकमधील बडी दर्गाच्या प्रारंगणातून जिल्हस्तरीय मुस्लीम महिलांचा मुक मोर्चाला प्रारंभ होणार आहे.भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट प्रत्येक धर्मीयांना त्यांच्या धर्माच्या नियम व रितीरिवाजाचे पालन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तीहेरी तलाकसंदार्भात पुर्वीपासून (१९८६) कायदा अस्तित्वात असताना नव्याने विधेयक सादर करण्याची गरज नसल्याचे शरियत बचाव समितीने म्हटले आहे. तलाक हा वैवाहिक स्वरुपाची बाब असून ती दिवाणी स्वरुपाची आहे. जर सर्व धर्मीयांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही, मग नव्या विधेयकानुसार मुस्लीम धर्मीयांना तलाक घटस्फोटाबाबत शिक्षेची तरतूद कशासाठी? असा प्रश्नही शरियत बचाव समितीने प्रसिध्दी पत्रकातून उपस्थित केला आहे. इस्लामी शरियतने तीहेरी तलाक संकल्पना हराम (नापसंत) ठरविली आहे. असे विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने या सर्व बाबींचा विचार करुन तीहेरी तलाकविरोधी विधेयक तातडीने रद्द करावे, या मुख्य मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने महिलांचा मूक मोर्चा काढला जात आहे. या मोर्चासाठी जिल्हाभरातून महिला सहभागी होणार आहे. मोर्चाचा एकुण मार्ग दिड किलोमीटरचा असून मोर्चाच्या प्रारंभी शहर-ए-खतीब देशाच्या एकात्मता, प्रगती व मानवतेच्या कल्याणासाठी बडी दर्गामध्ये दुवा करणार आहे. त्यानंतर मोर्चाला सुरूवात होईल. मोर्चाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यात आले आहेत. तसेच संपुर्ण मोर्चकरी महिलांसाठी स्वतंंत्ररित्या महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चाच्या आजुबाजुला पुरूषांची कुठल्याहीप्रकारे गर्दी राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून वाहतूक व्यवस्था स्थानिक मुस्लीम मंडळांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शहरातील विविध उपनगरीय भागांमधूनही वाहनव्यवस्था उपलब्ध आहे. शहरासह संपुर्ण जिल्ह्यात मोर्चासाठी फलक उभारण्यात आले आहे.
असा आहे मोर्चाचा मार्गबडी दर्गा (जुने नाशिक), पिंजारघाटरोडने शहीद अब्दुल हमीद चौक, त्र्यंबक पोलीस चौकी (खडकाळी), गंजमाळ सिग्नल, जिल्हा परिषदसमोरुन त्र्यंबकनाका, शहाजहांनी ईदगाह मैदानापर्यंत येणार आहे. ईदगाह मैदानामध्ये मुस्लीम महिला धर्मगुरूंचे प्रवचन सभा आयोजित करण्यात आली आहे.
चोख पोलीस बंदोबस्तमूक मोर्चासाठी शहर पोलीस आयुक्तालय, भद्रकाली पोलीस ठाणे, मुंबईनाका पोलीस ठाणे, सरकरवाडा पोलीस ठाणेहद्दीत चोख पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. दोन उपआयुक्त, दोन सहायक आयुक्त, दहा पोलीस निरिक्षक, ३२ महिला, पुरूष पोलीस उपनिरिक्षक, ३०२ पुरूष कर्मचारी, १७५ महिला पोलीस, दोन स्ट्रायकिंग पोलीस फोर्स, १ निर्भया पोलीस पथक, तीन अती महत्वाची वाहने असा पोलीस बंदोबस्त मोर्चासाठी पुरविण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे बंदोबस्ताची मुख्य सुत्रे सोपविण्यात आली आहे.