येवला (नाशिक) : पक्षात अनेक तरुण चांगले काम करत असून, नव्या चेहऱ्यांना पवारसाहेब संधी देतील. परंतु, जेथे अजिबात पर्याय नाही, तेथे पक्षात परत येणाऱ्यांना घेण्याचा विचार करू, असे विधान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
महायुतीकडून होणाऱ्या गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, बीडमध्ये फेरमतदान घ्यावे अशी मागणी देखील करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत येण्यास इच्छुक असल्याच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याचे सांगत जेथे पर्याय नाही, तेथे त्याबाबत विचार करू, असे सांगत दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले. राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, याचा पुनरुच्चार करीत वंचितने भाजपला मदत करण्यासाठीच उमेदवार दिल्याचे आता लाेकच बोलत आहेत. त्यामुळे लोकं मत वाया घालवणार नाहीत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.