नाशिक : उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपुर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले. या गंभीर घटनेने अवघे शहर हादरले तसेच पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. शहर पोलिसांचे विविध पथके या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत असताना एका पथकाला टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या सुरतमध्ये आवळण्यास यश आल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यात सुत्रधार हाती लागला असला तरी त्याचे अन्य पाच साथीदार अद्यापही फरार आहेत.अंबड पोलीस ठाणे हद्दीत उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.१४) सहा संशयित दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढविला होता. या हल्ल्याप्रसंगी दरोडेखोरांना विरोध करणारा धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअलचा बळी गेला. हल्लेखोरांनी पाच गोळ्या त्याच्या शरिरावर झाडल्या; मात्र त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कोट्यवधींचे सोने सुरक्षित राहिले आणि हल्लेखोरांना कार्यालयातून रिकाम्या हाती परतावे लागल्याचेही नांगरे पाटील म्हणाले.दरम्यान, हल्लेखोरांचे उशीरा हाती लागलेले वर्णन, सुक्ष्म पध्दतीने त्यांनी रचलेला कट, बनावट नोंदणी क्रमांकाच्या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर, गुन्हा करून अवघ्या १७ मिनिटांत शहराबाहेर पसार होण्यास यशस्वी ठरलेले गुन्हेगार या बाबींमुळे पोलीसांपुढे त्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. संशयित आरोपींना गजाआड करण्यासाठी नांगरे पाटील यांनी तत्काळ उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दहा स्वतंत्र पथके राज्यात व परराज्यांमध्येही रवाना केले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामशेज किल्ल्याजवळ गुन्ह्यात वापरलेल्या तीन पल्सर-२२० दुचाकी पोलिसांना दुस-या दिवशी आढळून आल्या. या दुचाकींचे नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाले तसेच चेसीज, इंजिन क्रमांकाशी गुन्हेगारांनी छेडछाड केल्याने तपासाचा पुढील मार्ग बंद झाला; मात्र दुचाकी नेमक्या कोणाच्या? कोठून आणल्या? या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांनी थेट पुण्याच्या चाकणमधील बजाज कंपनीकडून पल्सर-२२० दुचाकींची माहिती मागविली. तसेत फायनान्स कंपन्यांकडूनही या प्रकारच्या दुचाकींची माहिती घेत एका दुचाकीच्या गुजरातमधील जनार्दन गुप्ता नावाच्या मालकापर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले. त्यावरून पोलिसांनी माग काढत सुरतमधून मुळ उत्तरप्रदेशच्या बैसान गावाचा रहिवाशी टोळीचा म्होरक्या जितेंद्र विजयबहाद्दूर सिंग राजपुत याच्या मुसक्या आवळल्या.