नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर यापुढे दोन महिला प्रतिनिधी नेमण्यास त्याचबरोबर मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व बहाल करण्याचा महत्त्वाचा निर्णय शनिवारी झालेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्याचबरोबर संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षाचा प्रचार व निवडणुकीस उभे राहण्यास निर्बंध घालण्याचाही ठराव करण्यात आला. मविप्रची १०६ वी सर्वसाधारण सभा यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. तुषार शेवाळे होते. सभेच्या प्रारंभी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रास्ताविक व संस्थेच्या कामाचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी करावयाचे प्रयत्न त्याचबरोबर संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा ताळेबंद सादर केला. त्यानंतर नियमित विषयांना मंजुरी देण्यात आली. यापूर्वी सर्वसाधारण सभेने संस्थेच्या संचालक मंडळावर दोन महिला प्रतिनिधी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास धर्मादाय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले असता धर्मादाय आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळावर महिलांना प्रतिनिधित्व देण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, त्याचबरोबर मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व बहाल करण्यासही धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी दिली असल्याने यापूर्वी दोनशे रुपयांवरून पाच हजार रुपये सभासद शुल्क आकारण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्याबाहेर संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविण्याबरोबरच संस्थेच्या सेवकाला कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद अथवा पदाधिकारी राहता येणार नाही तसेच सेवकाला शिक्षक पतपेढी, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद याव्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस उभे राहता येणार नाही. दुसऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारी मंडळावर पदाधिकारी किंवा सदस्य असल्यास त्यावर समाजाच्या अध्यक्ष अगर पदाधिकारी अथवा कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून निवडणूक लढविता येणार नाही. या नियमांचा भंग करून निवडून आल्यास त्याची निवडणूक अवैध समजली जाईल व त्यास संस्थेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, हाॅर्टिकल्चर महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मूक-बधिर महाविद्यालय, महिला महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेसाठी जवळपास तीन हजारांहून अधिक सभासदांनी हजेरी लावली. काही सभासदांना बैठकीची लिंकच दिली गेली नसल्याचे, तर काहींना तांत्रिक दोषामुळे आपले म्हणणे मांडता आले नसल्याची तक्रार करण्यात आली. या सभेसाठी लिंक न मिळाल्याने सभासद ॲड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाला शरद पवार यांचे, तर कसबे सुकेणे येथील शाळेला कै. मालोजीराव मोगल यांचे नाव देण्याची सूचना केली तसेच संस्थेसाठी मोहाडी येथील जागा खरेदीत अनेक अनियमितता असल्याने यापुढे जागा खरेदी व बांधकामावर निधी खर्च न करण्याची सूचना केली. सुमारे दोन तास चाललेल्या या सभेस अध्यक्ष शेवाळे व सरचिटणीस पवार यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. बैठकीस सभापती माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, राघोनाना अहिरे, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रय पाटील, नाना महाले आदी संचालक व अधिकारी उपस्थित होते.