लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : येथील आदर्श सोशल ग्रुपतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने गणरायाची स्थापना करून ‘माझे स्वच्छ ताट अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत गणेशभक्तांना अन्नाची किंमत कळावी, या उद्देशाने बॅनर छापून मंडळाच्या येथे लावण्यात आला आहे. या बॅनरवर रिकामी फ्रेम लावण्यात आली आहे. यावर काही मजकूर लिहिण्यात आला आहे. देशातल्या २० करोड लोकांचे पोट ह्या बॅनरसारखे रिकामे (उपाशी) असते. त्यामुळे पुढच्या वेळेस ताटात अन्न उष्टे ठेवायच्या आधी विचार जरूर करा, हवे तितकेच अन्न ताटात घ्या, कारण महिने लागतात पिकवायला अन् मिनिटे लागतात फेकायला. असेच अन्न जर टाकत राहिलो तर भविष्यात अन्नाचा तुटवडा भासेल, उपासमार होईल, अन्नधान्याचे जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक औषधे व खतांचा वापर अधिक वाढेल. त्यामुळे मानवी शरिरावर वाईट परिणाम होतील, म्हणून अन्न वाया घालवू नये, याविषयी आदर्श सोशल ग्रुपचे अध्यक्ष मयूर मालपुरे, उपाध्यक्ष नीलेश कोठावदे व सभासदांकडून आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------
कळवण शहरात आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम ग्रुपने राबविले आहेत. यावर्षी ‘माझे स्वच्छ ताट अभियान’ राबवत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे व उपाशी राहणाऱ्या गरजवंतांना अन्नदान करावे.
- मयूर मालपुरे - अध्यक्ष, आदर्श सोशल ग्रुप, कळवण
----------------
सामाजिक उपक्रम
शहीद जवानांच्या दोन कुटुंबीयांना २१ हजार रुपये मदत, शेतकरी आत्महत्या केलेल्या अनाथ मुलांच्या आधारतीर्थ आश्रमातील मुलांना १५० ब्लँकेट, शहरातील हनुमान मंदिराला १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी, माणुसकीची भिंत रंगवून गरजवंतांना जुन्या परंतु वापरायोग्य कपड्यांची मदत, शहरात मोकाट जनावरांसाठी ग्रुपने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. शहरातील जाणकाई विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वाॅटर फिल्टर बसवला आहे. शहरातील देवी भक्तांसाठी रास दांडियांचे आयोज़न केले आहे.