देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूलजवळील मल्हारीबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या शिरोळे मायलेकींनी अचानकपणे रविवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास आपली मोपेड बाइक काढली अन् पाळदे मळ्याजवळील रेल्वे ट्रॅक गाठला. ट्रॅकपासून काही मीटर अंतरावर दुचाकी उभी करून दोघींनी धावत्या रेल्वेपुढे उडी घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देवळाली कॅम्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मल्हारीबाबा मंदिराजवळ अनिता बाळासाहेब शिरोळे (४३) या त्यांची कन्या राखी शिरोळे (२३) पती बाळासाहेब यांच्यासमवेत राहत होत्या. पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार असून, ते रविवारी सोलापुरात कामानिमित्त गेलेले होते. घरात मायलेकी दोघीच होत्या. या दोघींनी अचानकपणे सकाळी साडेनऊच्या सुमारास मायलेकींनी स्कूटी गाडीने रेल्वे ट्रॅक गाठला. डाऊन लाईनवरून नाशिककडे भरधाव येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसपुढे दोघींनी आत्महत्या केल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांनी सांगितले. पोल क्रमांक १७६/५ जवळ दोघींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आले. एकाच वेळी आई व मुलीने आत्महत्या केल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. राखी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यांची थोरली मुलगी विवाहित आहे. मायलेकीने नेमके असे टाेकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकलेला नव्हता. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पवार या करीत आहेत.
--इन्फो--
....अशी उघडकीस आली घटना
पाळदे मळा परिसरात शेतीचे काम करण्यासाठी शेतकरी मजूर वर्ग शेतात जात असताना त्यांना रेल्वे ट्रॅकजवळ बेवारसपणे स्कूटी दिसली. यामुळे शेतकऱ्यांचा संशय बळावला. शेतकऱ्यांनी स्कूटीजवळ जाऊन बघितले. तसेच आजूबाजूलाही कोणी दिसत नसल्याने त्यांनी रेल्वे रुळाजवळ जाऊन डोकावले असता तेथे महिलांचे दोन मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले. शेतकऱ्यांनी घटनेची माहिती त्वरित देवळाली कॅम्प पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले.
---