लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने भाजपावर नाराज असलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासाठी नामांकन अर्ज नेण्यात आल्याने ते बंडखोरी करतात की अन्य उमेदवाराला पाठिंबा देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून चव्हाण यांची नाराजी काढली जाण्याची व्यक्त केली जाणारी शक्यताही जवळपास मावळली आहे. या संदर्भात चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी ‘भाजपाच्या नेत्यांच्या भ्रमणध्वनीतून माझा नंबर डिलीट झाला असावा’ अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करतानाच, मंगळवारी अखेरच्या दिवशी आपली भूमिका जाहीर करू असे वक्तव्य करून संदिग्धता ठेवली आहे.
तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी यंदा रद्द करून त्याऐवजी ती डॉ. भारती पवार यांना देण्यात आल्यामुळे चव्हाण नाराज झाले आहेत. पुढील राजकीय भूमिका ठरविण्याबाबत त्यांनी गेल्या आठवड्यात समर्थकांचा मेळावा घेऊन लवकरच भूमिका जाहीर करू अशी घोषणा केली असली तरी, भाजपाकडून त्यांची ऐनवेळी समजूत काढली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना व खुद्द चव्हाणदेखील तशी अपेक्षा बाळगून आहेत. शुक्रवारी नाशकात सेना-भाजपाच्या संयुक्त मेळाव्यासाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून चव्हाण यांची मनधरणी केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्याचमुळे की काय चव्हाणदेखील नाशकातच तळ ठोकून होते. परंतु पालकमंत्री वा भाजपाच्या कोणा नेत्याकडून त्यांना विचारणा झाली नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, कदाचित भाजपा नेत्यांच्या भ्रमणध्वनीतून माझा नंबर डिलीट झाला असेल, आपल्याशी कोणीशी संपर्क साधला नसून, मध्यंतरी बाहेरगावी असल्याने समर्थकांकरवी लोकसभेचे नामांकन मागविण्यात आले आहे. अजून दोन दिवसांचा कालावधी नामांकन भरण्यासाठी बाकी असल्याने समर्थकांशी तोपर्यंत चर्चा करून मंगळवारी त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ असे सांगून आपली भूमिका संदिग्ध ठेवली आहे.