नाशिक : केंद्र शासनाच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने ‘मेरा राशन’ हे ॲप विकसित केेले आहे. रोजगारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या मजुरांना रेशनच्या धान्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे देशात कुठेही कामासाठी गेलेल्या मजुराला तेथील राज्यातून रेशनच्या धान्याचा लाभ मिळू शकणार आहे.
सुरुवातीला ३२ राज्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. ‘वन नेशन, वन राशन’ या उपक्रमाचा हा भाग असून एकच रेशनकार्ड इतर राज्यांमध्ये देखील सुरू राहू शकेल आणि त्याला तेथे रेशन मिळू शकेल यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपमध्ये संबंधित मजुराला ज्या राज्यात जायचे आहे त्या राज्याचे रजिस्ट्रेशन ॲपमध्ये करावे लागणार आहे.
एनआयसीकडून हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. सुरुवातीला हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप तयार करण्यात आलेेले आहे. हळूहळू हे १४ प्रादेशिक भाषेत विकसित केले जाणार आहे.
--तक्रार ॲपवर नोंदवा--
या ॲपच्या माध्यमातून संबंधित मजुरांना आपल्या रेशनकार्डाची माहिती ॲपवर देता येणार आहे. रेशन मिळण्याबाबतची तक्रार आणि रेशनची मागणी देखील नोंदविता येणार आहे. मागणी नोंदविल्यानंतर त्यास त्याच्या सवडीनुसार धान्य घेता येणार आहे.
--इन्फो--
१२,६०,७३३
जिल्ह्यातील लाभार्थी
४,७२,४०१
बीपीएल
१,७६,७८१
अंत्योदय
६,११,५५१
केसरी