मालेगाव : शहरातील कॅम्प परिसरात घडलेली धक्कादायक घटना सर्वांना हादरवून गेली. मल्लू शेठ बंगला भागातील रहिवासी संगीता शिशुपाल जयस्वाल (५८) यांच्या घरात अचानक लागलेली आग ही अपघात नव्हे, तर कौटुंबिक वादातून जाणीवपूर्वक लावलेली असल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. शनिवारी पारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक धुराचे मोठे लोट आणि आगीच्या ज्वाळा घराच्या वरच्या मजल्यावरून दिसू लागल्या. लागलीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविल्याने नुकसान कमी झाले. मात्र, ही आग कशामुळे लागली याचा निष्कर्ष काढण्यापूर्वीच आग आपल्या मुलानेच लावल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे.
आग लागल्याची घटना घडल्यानंतर माहिती मुख्य अग्निशमन केंद्राला मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी संजय दादाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली तीन गाड्यांना जवानांसह घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी दोन मोठ्या पाईप आणि चार होजरीलच्या साहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण काय असावे, असा निष्कर्ष अग्निशमन दल काढत असताना संबंधित महिलेने आग लागली नसून आपल्या मुलानेच घर पेटवून दिल्याची तक्रार केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संगीता शिशुपाल जयस्वाल यांचा मुलगा अभिषेक शिशुपाल जयस्वाल यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता.
जीवितहानी नाहीसुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य, फ्रीज, कपाट, कूलर, कपडे व अन्य वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमनच्या बंबांद्वारे जवान फायरमन तुकाराम जाधव, अमोल जाधव, अजय पवार, राशीद अख्तर शहबाज बेग, सागर ह्यालिज शमुवेल कुवर, चालक फिरोज पठाण, चंद्रकांत अहिरराव, जीवन महिरे यांनी आगीवर पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणली.