नाशिक : शहरातील कमोदनगरजवळ उड्डाणपूल ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात माय-लेकाचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जाण्यासाठी उड्डाणपूल ओलांडणाऱ्या तांबट व कासार कुटुंबातील सदस्यांना मुंबईकडून शहराकडे भरधाव जाणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक भीषण असल्याने चारवर्षीय मुलासह मातेचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक भटुलाल कासार पूल ओलांडला असल्याने ते सुदैवाने बचावले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळा-वरून फरार झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येतआहे. कमोदनगर परिसरातून सिडकोकडे जाताना बुधवारी (दि.२९) उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत शीतल आशिष तांबट (३०, रा. गोपाल-कृष्ण चौक) व त्यांचा मुलगा कुणाल तांबट हे जागीच ठार झाले तर यशोदा भटुलाल कासार (६५) यांच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या तसेच मयत शीतल यांचे सासरे सुभाष चुनीलाल तांबट (५५) यांनाही वाहनाची धडक बसल्याने तेदेखील गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी उड्डाणपुलावर एकच धाव घेतली तसेच अंबड पोलीस ठाण्यालाही अपघाताची माहिती कळविण्यात आली. घटनास्थळावरून अज्ञात वाहनचालक अपघातग्रस्त वाहनासह फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक तुषार चव्हाण, राकेश शेवाळे यांच्या आदींनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले. तसेच बिनतारी संदेश यंत्रणेवरून अपघातग्रस्त वाहनाच्या वर्णनाचा संदेशही प्रसारित करण्यात आला. वैद्यकीय अधिकाºयांनी माय-लेकाला मयत घोषित केले. सुंदरबन कॉलनीमधील तांबट कुटुंबीयांची सून व नातवाचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण कॉलनीसह सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उड्डाणपुलाच्या त्रुटीचे बळीमुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल उभारणीच्या त्रुटींचे बळी सुंदरबन कॉलनीजवळ सिडकोचे माय-लेक ठरले. सिडको सुंदरबन कॉलनीतून इंदिरानगरकडे जाणाºया रस्त्यालगत उड्डाणपुलाला बोगदा तयार करणे गरजेचे होते; मात्र या ठिकाणी राज्य सरकार व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घातले नाही. त्यामुळे बोगदा तयार होऊ शकला नाही. परिणामी सुंदरबन कॉलनी व सिडकोमधील रहिवाशांना इंदिरानगर, राजीवनगर, कमोदनगर आदी परिसरात जाण्यासाठी थेट उड्डाणपूल ओलांडावा लागतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते.
उड्डाणपुलावरील अपघातात माय-लेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:45 AM