नाशिक : जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले असून, त्या प्रमाणात उपचारासाठी लागणाऱ्या ॲम्फोटेरेसिन उपलब्ध होत नसल्याने या आजाराने बाधित नागरिकांच्या जीवाचा धोका वाढला आहे. मात्र, म्युकरमायकोसिस हा संपर्कामुळे किंवा संसर्गामुळे होत नसल्याने सामान्य नागरिकांसाठी तो धोकादायक नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे ३२४ रुग्ण आढळले असून, त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दिला जात आहे. परंतु, म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसून ज्यांना कोरोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉइड जास्त प्रमाणात दिले असतील किंवा ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल अशांनाच या आजाराची बाधा होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील ८ रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केले आहे. तसेच शासकीय रुग्णालयात ज्या विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, त्यांना ऑन कॉल पाचारण करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, या आजाराबाबत आजही नागरिकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही जास्त प्रमाणात वाफ घेणे अयोग्य असून, त्यामुळे नाकात जखम होऊनही या आजाराची बाधा होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर नाकाची तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
इन्फो
आजाराची प्राथमिक लक्षणे
नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक दुखणे, नाकावाटे रक्त येणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळ्यांची नजर हलणे, समोरचे दोन दोन दिसणे, डोळ्याची हालचाल थांबणे, डोळ्यांना सूज येणे, हे या आजाराचे दुसरे महत्त्वाचे लक्षण आहे. वेळीच उपचार न केल्यास हा आजार डोळ्यांवाटे थेट मेंदूत जाऊ शकतो. डोळा आणि मेंदूमध्ये हाडाचा एक थर असतो. मात्र, उपचार न केल्यास तेथूनही हा म्युकर थेट मेंदूत जाऊन हल्ला करतो. त्यामुळे डोके सतत दुखणे हे आणखी एक महत्त्वाचे लक्षण असून मेंदूपर्यंत म्युकर पोहचणे जीवासाठी धोकादायक असते.
इन्फो
ही घ्या काळजी
हा आजार रोखण्यासाठी सर्वांत प्रामुख्याने गंभीर कोरोना रुग्णाने नाकाची तपासणी करूनच घरी जावे. गरम पाण्याची वाफ लांबूनच अत्यल्प प्रमाणात घ्यावी. जलनेती किंवा औषधांनी नोजल वॉश करणे, धुतलेल्या रुमालाचा वापर करणे, मास्क प्रत्येकी वेळी नवीन वापरणे, त्यातही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी मधुमेह नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांत मोठा धोका अशाच रुग्णांना असल्याचे दिसून आले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यांनादेखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
इन्फो
इंजेक्शनचा पुरेसा साठा कधी ?
जिल्ह्यात ॲम्फोटेरेसिनचा प्रचंड तुटवडा जाणवत असून रुग्णसंख्या सव्वातीनशेवर पोहोचलेली असल्याने प्रत्येकाला दिवसाला आठ याप्रमाणे दररोज किमान अडीच हजार इंजेक्शन्स हवे असताना प्रत्यक्षात अडीचशे इंजेक्शन्सही मिळत नसल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त नागरिकांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. हे इंजेक्शन्स पुरेशा प्रमाणात आणि कमी किमतीत उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे.
इन्फो
डॉक्टर म्हणतात...
संसर्गातून हा आजार पसरत नाही. ज्या कोरोनाबाधित रुग्णांवर आयसीयूत जास्त दिवस उपचार झाले असतील, ज्या रुग्णांना स्टेरॉइड जास्त प्रमाणात दिले असतील किंवा ज्यांना मधुमेह असेल, अशा रुग्णांना याचा धोका संभावतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर नाकाची चाचणी करून घेऊन मगच रुग्णाने घरी जावे. म्युकरची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. पहिल्याच टप्प्यात या आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष केले गेले नाही, तर या आजारावर लवकर उपचार होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
डॉ. पुष्कर लेले, कान, नाक, घसा तज्ज्ञ
आठवडाभरात शस्त्रक्रिया विभाग
जिल्हा शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आठवडाभरात शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटरची रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ आदींचे तसेच दंतचिकित्सकांचे पथक सज्ज असून आवश्यकतेनुसार बाहेरूनदेखील न्युरो सर्जनना ऑन कॉल उपलब्ध करून घेतले जाणार आहे.
डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
------------
डमी