नाशिक : ‘त्या’ घरासमोरच्या इमारतीत एक खून होतो... उघड्या डोळ्यांनी ‘ती’ खून पाहते; पण खुनाचे धागेदोरे काही लागत नाही... पोलीसही वैतागून तपास सोडतात... अन् अखेरीस समोर येते वेगळेच सत्य...देवळाली गाव येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाच्या निमित्ताने रहस्यमय गुंफण असलेला थरारपट रसिकांना अनुभवायला मिळाला. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य महोत्सवामध्ये महाकवी कालिदास कलामंदिरात हा प्रयोग रंगला. ‘रेअर विंडो’ या गाजलेल्या हॉलिवूडपटावर बेतलेल्या या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी केले आहे. अनुराधा व श्रीरंग हे दाम्पत्य एका आलिशान बंगल्यात राहायला येते. अनुराधाला समोरच्या निर्मनुष्य इमारतीत एकाचा खून झाल्याचे दिसते. पोलीस घरी येतात; मात्र तपास लागत नाही. अनुराधाला नंतरही समोरच्या इमारतीत अशा चित्रविचित्र गोष्टी दिसत राहतात आणि खुनाचे रहस्य आणखी गडद होत जाते. अखेरीस गूढ उलगडून प्रेक्षकांना धक्का देणारे वेगळेच सत्य समोर येते. अर्चना नाटकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले व अनुराधाची भूमिकाही त्यांनीच साकारली. निर्मिती भानुदास जोशी व बाबा चिटणीस यांची होती. अभिजित कार्लेकर, पल्लवी खैरनार, मकरंद कुलकर्णी, एजाज शेख, विजय धुमाळ, करण गायकवाड, राहुल शिरवाडकर, वल्लभ हयातनगरकर, राजेंद्र हांडोरे, रामदास गुळे यांच्या भूमिका होत्या. अमोल काबरा व सौरभ कुलकर्णी (संगीत व ध्वनिसंयोजन), नारायण देशपांडे (रंगभूषा), रवींद्र रहाणे, राहुल शिरवाडकर (प्रकाशयोजना), तर विष्णू हजारे, सिद्धार्थ जाधव, सचिन जाधव यांनी रंगमंच व्यवस्था यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)
रहस्यमय गुंफणीचे ‘समोरच्या घरात’
By admin | Published: January 24, 2015 12:01 AM