नाशिक : सोमेश्वर कॉलनीनजीक महापालिका गटारीचे चेंबर साफ करताना मृत्यूमुखी पडलेल्या तिघा कामगारांच्या घटनेची तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची महापालिका आयुक्तांची घोषणा हवेतच विरली असून, या संदर्भात चौकशी अधिकाऱ्याची अद्यापही नेमणूक न करण्यात आल्याने सदरची घटना नेमकी कशी घडली याबाबतचे गूढ कायम आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडील तिघे कामगार तुंबलेल्या महापालिकेची गटार साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरले असता, एकापाठोपाठ एक अशा तिघांचे विषारी वायुने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर जनक्षोभ उसळल्याने संंबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर घटनेविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असलेल्या उलट-सुलट माहितीवरून अधिकच संभ्रम निर्माण झाल्याने महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना याची माहिती देताना नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकरवी ही चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. ज्या गटारीत तिघा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला ती भूमिगत की पावसाळी गटार याचा उलगडा अद्यापही झालेला नाही, तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी झाली असती तर गटारीचे रहस्य व त्यापाठोपाठ कामगारांच्या मृत्यूची कारणेही स्पष्ट होण्यास मदत झाली असते, परंतु या संदर्भातील चौकशी व चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक या दोन्ही गोष्टी प्रशासनाच्या कागदोपत्रीच ठरल्या असून, घटनेचे गूढ कायम आहे.
घटनेचे गूढ कायम : जिल्हा प्रशासन अनभिज्ञ
By admin | Published: January 14, 2015 12:03 AM