नाशिक : उद्योग-व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर संयम अतिशय महत्त्वाचा आहे. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम केले तर कोणत्याही व्यवसायात यश निश्चित मिळते, असा कानमंत्र दुुबईस्थित ‘अल अदील’ उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी नवउद्योजकांना दिला. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कूर्तकोटी सभागृहात शुक्र वारी (दि.२६) ‘संस्कृतीवैभव’ आणि मिती क्रि एशन निर्मित ‘उद्योग प्रेरणा’ कार्यक्र मात डॉ. धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी डॉ. दातार यांनी त्यांच्या यशस्वी उद्योजकतेचे रहस्य उलगडून सांगितले. यावेळी डॉ. धनंजय दातार यांच्या पत्नी वंदना दातार, बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, ‘रामबंधू मसाले’चे आनंद राठी, उद्योजक धनंजय बेळे, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. निवेदिका उत्तरा मोने यांनी डॉ. दातार यांच्या व्यावसायिक आणि खासगी जीवनातील विविध पैलूंना उजाळा देत विचारलेल्या प्रश्नांना डॉ. धनंजय दातार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, उत्पन्नाचा काही भाग बचत करा, बचतीतून नवीन गुंतवणूक करून वाचवलेल्या पैशातून नफा कमवा म्हणजे पैसा वाढेल आणि पैसा वाढत गेला की तो आपल्या आनंदासाठी वापरा तसेच तुमच्या कमाईला बांधिलकीची जोड देत कमावलेला पैसा चांगल्या कामासाठी खर्च करा, असा सल्ला धनंजय दातार यांनी दिला. बालपणातील हालाखीच्या प्रसंगांचे वर्णन करताना एकाच गणवेशात अनवाणी केलेल्या शाळेच्या पायी प्रवासापासून शैक्षणिक प्रवासाची वाटचाल त्यांनी उलगडून सांगितली. शिक्षणात फारसे स्वारस्य नसले तरी दुबईला जाऊन आलेल्या लोकांच्या जीवनमानाचे आकर्षण होते. याच काळात वडील निवृत्त झाल्यानंतर आपणही दुबईत जाऊन श्रीमंत व्हावे, असा विचार मनात येत असे. दुबईतील भारतीयांना त्यांच्या गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होत नाहीत, हे बघून वडील महादेव दातार यांनी तिकडे एक छोटे दुकान सुरू केले. त्यांच्या मदतीसाठी दुबईला गेल्याने उद्योजकतेच्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. दुकानात झाडू मारणे, लादी पुसण्यापासून पडेल ते काम केले. प्र्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक संस्कृतीवैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले. सुप्रिया देवघरे यांनी आभार मानले. अहंकार बाळगू नका कोणत्याही कामाला कमी प्रतीचे न मानता ते पूर्ण निष्ठेने केले पाहिजे. असे काम करताना अनेकदा अपमान पदरी पडतो परंतु, अपमान पचवला तर यशही पचवता येते. त्यामुळे श्रीमंतीचाही कधी अहंकार बाळगू नये, असे आवाहन डॉ. धनंजय दातार यांनी केले. एक दुकानापासून ३९ मॉलचा मालक होण्यापर्यंत कराव्या लागलेल्या संघर्षाच्या प्रवासात आलेल्या अडचणींच्या प्रसंगामध्ये आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्याने यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचे बळ मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बचतीसोबतच गुंतवणूकही आवश्यक उद्योग-व्यवसायातून मिळालेल्या पैशातून बचत करणे आवश्यक असून, अशा बचतीतूनच एकामागून एक दुकानं आणि मॉल्स सुरू केल्याचेही डॉ. दातार यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर बँकेकडून कर्ज घेतले तेव्हा पहिल्या दुकानाची उलाढाल पाहून सर्वांत कमी व्याजदरावर कर्ज देणाºया बँकेकडून कर्ज काढून इतर बँकांचे कर्ज फेडले आणि वाचवलेला पैसा दुसºया ठिकाणी गुंतवल्याचे सांगून बचतीसोबतच गुंतवणुकीचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.
‘उद्योग प्रेरणा’तून उलगडले ‘मसालाकिंग’च्या यशाचे रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:46 AM