नाशिक : मुक्ता व श्रीकृष्णाची प्रेमकथा, नाट्यवेदाच्या उगमाची गोष्ट उलगडून दाखवत पौराणिक नाटकांनी संस्कृत नाट्य स्पर्धेत आज रंगत आणली. सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इंदापूर-रायगडच्या रंगमित्र कलामंडळाच्या वतीने ‘मुक्ता’ नाटक सादर झाले. प्रभाकर भातखंडे लिखित संस्कृत भाषेतील हे पहिलेच वगनाट्य होते. भार्गव पटवर्धन दिग्दर्शित या नाटकात सागर खातू, राकेश पवार, प्रणय इंगळे, ज्योती पवार, प्रीती भोसले-जाधव यांच्या भूमिका होत्या. एका ध्येयवादी आदर्श शिक्षिकेची कथा ‘सुधाखण्डा: केचित’ या नाटकातून मुंबईच्या रुईया महाविद्यालयाच्या संघाने मांडली. स्वराली पाटील, जिग्नेश किल्लेकर, विपाली पदे, अथर्व भावे, अद्वैत रुमडे यांनी भूमिका केल्या. लेखन राजेश शिंदे, तर दिग्दर्शन अभिजित खाडे यांचे होते. नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने ‘सिकतासु तैलम’ नाटकात पत्नीची स्मृती परत आणण्यासाठी जिवापाड प्रयत्न करणाऱ्या पतीचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले. डॉ. विभा क्षीरसागर लिखित व सतीश ठेंगडी दिग्दर्शित या नाटकात डॉ. अभिजित मुनशी, मालविका क्षीरसागर, विवेक अलोणी, किरण इंदाणे यांनी भूमिका साकारल्या. येथील दीपक मंडळाच्या वतीने ‘इंद्रध्वज:’ या नाटकातून नाट्यवेद या पाचव्या वेदाच्या जन्माची कथा सादर करण्यात आली. ब्रह्मदेव नाट्यवेद भरतमुनींकडे कसा सुपूर्द करतात, याच्या आख्यायिकेचे चित्रण या नाटकातून करण्यात आले. गिरीश जुन्नरे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सुरेश गायधनी यांचे होते. भूषण शुक्ल, अंकिता सोनवणे, सागर कुलकर्णी, कुंतक गायधनी, समृद्धी कुलकर्णी, शशांक कुलकर्णी, इशा दुबे, रश्मी रुईकर, कौस्तुभ शौचे, अनुष्का नांदुर्डीकर आदिंनी भूमिका केल्या. अनुवाद प्रा. डॉ. अनिरुद्ध मंडलिक यांनी केला होता, तर नृत्यदिग्दर्शन डॉ. संगीता पेठकर यांचे होते. दरम्यान, स्पर्धेत उद्या (दि. ३०) सकाळी १०.३० पासून अक्षगानम, आद्यम मे चौरर्यम, पादत्राणहीन:, तमसो मा ज्योतिर्गमय ही नाटके सादर होणार आहेत.
पौराणिक कथांनी आणली रंगत
By admin | Published: December 29, 2015 11:27 PM