इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जुने नागजी चौक व सध्याच्या सह्याद्री रुग्णालयालगत असलेली सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनली असून, या सिग्नल यंत्रणेची पायमल्ली केली जात असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या चौफुलीवर नेहमीच वाहतूक कोंडी आणि लहान-मोठ्या अपघातांची दखल घेत लाखो रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली, परंतु शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी नेमणूक न करण्यात आल्याने सिग्नल यंत्रणा फक्त नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या चौकात वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील चार मुख्य रस्ते एकत्र येतात यामध्ये पुणे महामार्ग, मुंबई महामार्ग आणि इंदिरानगर मार्गे वडाळा नाका ते पाथर्डीगाव रस्ते एकत्र येतात त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु चौफुलीवर असलेल्या सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहनधारक सिग्नल न पाळता वाहने हाकत असल्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.
नागजी चौफुलीवर सिग्नल नावापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:30 AM