मनमाड : नागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना गैरव्यवहार प्रकरणी निलंबित करण्यात आल्याच्या विभागीय महसूल आयुक्तांच्या निर्णयाविरोधात सरंपच आशा शिलावट यांनी सदरची कारवाई आकसापोटी करण्यात येत असल्याचा आरोप करत ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे केलेले अपील अमान्य करण्यात आले असल्याने खळबळ उडाली आहे.राज्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार संजय पवार यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी व महसूल आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची रितसर चौकशी होऊन सरंपच आशा शिलावट यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना सरपंच व सदस्य पदावरून तर ग्रामसेवक एस.एम. व्यवहारे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र या विरुद्ध सरंपच शिलावट यांनी सदरची कारवाई आकसापोटी करण्यात आली असल्याचा आरोप करत ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर यांच्याकडे अपील केले होते. यावर सुनावणी होऊन शिलावट यांचे अपील अमान्य करून विभागीय आयुक्तांचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)
नागापूर सरपंचपद धोक्यात; अपील अमान्य
By admin | Published: June 14, 2016 11:08 PM