निफाड नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. या १७ प्रभागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. मागील पंचवार्षिक संपताना निफाड शहर विकास आघाडी, शिवसेनेची सत्ता होती.
यावर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सुरुवातीपासून चुरस दिसून आली. तालुक्याचे आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, बसप पॅनलचे नेतृत्व माजी आमदार अनिल कदम, राजाभाऊ शेलार, राजेंद्र राठी, अनिल कुंदे यांनी केले. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार दिलीप बनकर यांच्याकडे होते.
निफाड नगरपंचायतीवर सत्ता राखण्यासाठी निफाड शहर विकास आघाडीचे नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून व्यूहरचना केली होती आणि वर्षापासूनच जवळजवळ पॅनलच्या उमेदवारांची निश्चिती केली गेली होती. निफाड शहर विकास आघाडीने १७ पैकी तेरा जागांवर निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १४ जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपने १० जागांवर तर काँग्रेसने ५ जागांवर निवडणूक लढवली होती. तर बसपने २ जागा लढवल्या होत्या, तर एकूण ५ अपक्ष या निवडणुकीत उभे होते.
निफाड शहर विकास आघाडीने ज्या पध्दतीने व्यूहरचना आखली, ग्राउंड लेव्हलला संपूर्ण डावपेच लढवले, प्रभागनिहाय कोणाला उमेदवारी द्यायची याची व्यूहरचना केली, शिवाय पॅनेलची निर्मिती करताना सर्व समावेशक पॅनल केले. या सर्व गोष्टींची परिणती बहुमताकडे घेऊन गेली. या पॅनलच्या सर्वच नेत्यांनी प्रत्येक प्रभागात विजयासाठी सूक्ष्म नियोजन केले. माजी आमदार अनिल कदम यांनी निफाड शहरात निवडणूक काळात आपला जास्तीत जास्त वेळ देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रचारातही झोकून दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनल निर्मिती व इतर निर्णय घेताना वेळ घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १४ प्रभागात उमेदवार उभे केले व इतर ३ प्रभागात इतर उमेदवारांना पाठिंबा दिला. याउलट सर्वच प्रभागात उमेदवार उभे करणे गरजेचे होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्याच प्रभागांमध्ये प्रचारात जान ओतून चांगले लक्ष दिले. हे करताना सर्वच प्रभागात गांभीर्याने प्रचारात लक्ष देऊन सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे होते, त्यामुळे त्यांचे नुकसान झाले.
निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस व बसप या युतीने सत्ता मिळवली आहे. या युतीतील निफाड शहर विकास आघाडीचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत सेनेचे ५ नगरसेवक होते.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचा १ नगरसेवक होता ती संख्या काँग्रेसने कायम राखत याही वर्षी १ नगरसेवक निवडून आणला.
बसपचा मागील निवडणुकीत एक नगरसेवक होता. यावर्षी बसपचा १ नगरसेवक निवडून आला आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले होते. मात्र हे तिघेही नंतर शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक या नगरपंचायतीत मागील पंचवार्षिक संपताना नव्हता. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले, पण सत्ता मिळवण्याइतपत बहुमत मिळवता आले नाही.
भाजपने १० जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र भाजपला एकही जागा मिळाली नाही. मागील निवडणुकीत भाजपचे ५ नगरसेवक होते.
या निवडणुकीत ५ अपक्षांनी निवडणूक लढवली, मात्र १ अपक्ष निवडून आला. थोडक्यात, या निवडणुकीत सेनेच्या जागा वाढल्या. शहर विकास आघाडीला ५ जागा मिळाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या. काँग्रेसने व बसपने मागील १ जागा टिकवली. भाजपला मात्र एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही.
सत्ता निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस-बसप युतीला मिळाली आहे. या युतीने निवडणुकीत निफाड शहराचा जो विकास आराखडा मतदारांसमोर ठेवला होता, त्यानुसार शहराचा विकास करण्यासाठी या युतीला प्रयत्न करावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना जनतेच्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.