पेठ : तालुक्यातील करंजाळीनजीक निरगुडे फाट्यावर रस्त्याच्या कडेला एका नागराज एकाच ठिकाणी ठाण मांडून असून, हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही हा नाग एकाच दगडावर वेटोळे करून बसला आहे. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. करंजाळीपासून दोन किमी अंतरावर निरगुडे फाट्यानजीक अगदी रस्त्याच्या कडेला नागपंचमीच्या दिवशी एका दगडावर नागराज येणाऱ्या-जाणाºया प्रवाशांच्या दृष्टीस पडला. जो-तो दर्शन घेऊन पुढे जाऊ लागला; मात्र नागराजाने जागा काही सोडली नाही. एक-एक दिवस लोटत गेला मात्र नागराज काही जागा सोडायला तयार नाही, तशी परिसरात चर्चा सुरू झाली आणी विविध तर्क-वितर्कांबरोबर याबाबतच्या कथाही सांगितल्या जाऊ लागल्या. काहींनी भावनेच्या भरात त्यावर हळदीकुंकू वाहून पूजाही केली तर काहींनी हा कात टाकण्याचा प्रकार असून, कात टाकण्यापूर्वी नागाला स्थूलपणा येत असल्याने तो जागा बदलू शकत नाही असे वैज्ञानिक दाखलेही दिले. सर्पमत्रांना पाचारण करून त्यास सुरक्षित ठिकाणी सोडून देण्याचा सल्लाही दिला जात आहे. तर या प्रकाराला अंधश्रद्धेचीही जोड दिली जात आहे.
नागराजाचा आठ दिवसांपासून निरगुडे फाट्यावर मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:09 AM