नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तळाला पोहोचलेले नागासाक्या धरण आता ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा आणि सिंचनाचाही प्रश्न मिटला आहे. नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. माणिकपुंज आणि हरणबारी देखील शंभर टक्के भरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी धरणातील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे समाधान देखील व्यक्त होत आहे. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून सुमारे २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक लहान-मोठे बंधारे फुटल्याने शेती आणि रस्तेही वाहून गेले. पशुधनाचे देखील मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पावसामुळे तालुक्यांमधील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नागासाक्या धरण शंभर टक्के भरून वाहत असून गुरुवार सकाळपासून ६३६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेला देखील यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. हरणबारी धरणही शंभर टक्के भरल्याने या प्रकल्पातून २५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. चणकापूर धरणही शंभर टक्केच्या दिशेने निघाले आहे. सध्या या प्रकल्पात ९३ टक्के इतका जलसाठा असला तरी पावसाचा जोर कायम असल्याने ८८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे केळझर ९४ तर पुनद प्रकल्पात ९५ टक्के इतका जलसाठा झाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा वाढला असल्याने तूर्तास पाण्याची चिंता मिटली आहे.
संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असतानाही पावसाने हुलकावणी दिली असली तरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वाहतूक शेतातील पिकांचे नुकसान झाले तर, दळण-वळणावरही परिणाम झाला. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर देखील पाणी साठल्याने प्रवाशांचेही हाल झाले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गुरुवारी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.