नाशिक : प्रदीर्घ परंपरा असलेल्या मखमलाबादची नागोबा यात्रा रद्द झाली असली तरी परंपरेप्रमाणे पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरातील नागोबा मूर्तीचे पूजन उत्साहात पार पडले. दरम्यान, नागपंचमीनिमित्त घरोघरी असलेल्या नाग-नरसोबाच्या चित्राचे पूजन करून खीर कान्हुल्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, मखमलाबादला तर नागोबा यात्रेची प्रदीर्घ परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे नागोबा यात्रेसह नागपंचमी सणावरही कोरोनाचे सावट सलग दुसऱ्या वर्षी होते. शहरालगतच्या परिघातील गावांमध्ये हा सण माहेरवाशिणींना झोक्याचा आनंद देणारा सण म्हणून ओळखला जातो. सासरी गेलेल्या नवविवाहिता खास करून पंचमीला माहेरी एकत्र येतात. चारचौघी मैत्रिणी एकत्र येऊन झोक्याचा आनंद लुटतात. यावेळी झोक्यावर बसून आनंदोत्सव गाणारी गीते ऐकायला मिळाली नाहीत. पण यंदा कोरोना लॉकडाऊन असल्याने शहरालगतच्या प्रमाणात लेकीबाळी कमी प्रमाणात आल्याचे दिसून आले. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाचे विशेष माहात्म्य आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी पडलेल्या सावटामुळे यंदा नागपंचमीचा उत्साह कमीच दिसून आला.
इन्फो
विविध धार्मिक कार्यक्रम
पंचवटी : नागचौक येथील पुरातन नागमंदिरात शुक्रवारी दरवर्षीप्रमाणे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागपंचमी उत्सवानिमित्ताने सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनाचा प्रसादाचा लाभ घेतला.
शुक्रवारी सकाळी नागचौक येथे नागदेवता पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये नाग देवताची प्रतिमा ठेवण्यात आलेली होती. नागपंचमीचे औचित्य साधून संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावर्षी कोरोना संकट असल्याने मिरवणूक काढण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने यावर्षी मिरवणूक काढली नाही. नागपंचमीनिमित्त सकाळी मान्यवरांच्या हस्ते नागदेवता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रुद्राभिषेक कार्यक्रम झाला. दुपारी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. नागचौक मित्रमित्रमंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.