नाशिक : क्रीडा क्षेत्रात सर्वाेच्च समजल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांमध्ये नाशिकमधील विविध खेळांच्या १७ खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये क्रीडाक्षेत्राला लाभलेल्या पोषक वातावरणामुळे नाशिकचे नाव क्रीडा क्षेत्रात गाजत असून, सर्वच क्रीडा प्रकारांत नाशिकने लौकिक प्राप्त केला आहे. त्यामुळे यंदा या यादीत नाशिकच्या १७ खेळाडूंची नावे आहेत. यामध्ये धावपटू संजीवनी जाधव, बुद्धिबळपटू विदित गुजराथी, सायकलपटू महाजन बंधू यांचा समावेश आहे. शुटिंगचे तीन पुरस्कार नाशिकला प्राप्त झाले असून, फेन्सिंगच्या दोघा खेळाडूंना छत्रपती पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे. गत तीन वर्षांसाठींचे हे पुरस्कार आहेत.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये खेळाडू आणि क्रीडा संघटकांचा समावेश आहे. नाशिकच्या क्रीडाविश्वात उभरत्या खेळाडूंनी क्रीडा जगताचे लक्ष वेधले असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नाशिकचा नावलौकिक उंचावला आहे. राज्य शासनानेदेखील नाशिकच्या खेळाडूंची दखल घेत या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.