नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात रांगडा कांदा लागवडीस वेग आला आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, या पिकांच्या काढणीपूर्वी कांदा लागवड पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. गेल्या वर्षभरापासून कांदा पिकाच्या दरातील चढउतारामुळे शेतकऱ्यांना चांगलेच रडवले आहे. कमी दरामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याचे चित्र असतानाही सर्वच दिवस सारखे नसतात या उक्तीप्रमाणे पुढील दिवसात कांद्याला चांगले दर मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नगदी म्हणून समजल्या जाणाऱ्या कांद्याच्या लागवडीवर भर दिला असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात दरवर्षी पाणी कमी होते तर खरीप हंगामात पावसामुळे कांदा पीक चांगले येत नाही. त्यामुळे उन्हाळ व पावसाळी या दोन हंगामातील रांगडा कांदा या भागात घेतला जातो. लालरंग, चविला चांगला व आकाराने मोठा असलेल्या या रांगडा कांद्याला बाजारात अनेकदा चांगला दर मिळतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे रांगडा कांदा यंदा दोन पैसे मिळवून देईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन त्याची रोपवाटिका तयार केली होती. ही रोपे लागवडी योग्य झाल्याने कांदा लागवड सुरु झाली. (वार्ताहर)या परिसरात गेल्या महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने कांद्याची रोपे झोडपले होते. एक पायलीभर कांद्याच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा दहा ते बारा हजार रुपये मोजावे लागले होते. त्यातही पावसाने नुकसान झाल्याने लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांना कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांना रडवले आहे.
नायगावी कांदा लागवडीस प्रारंभ
By admin | Published: October 09, 2014 10:46 PM