नाशिक : दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळच्या रस्त्यालगत एका मोकळ्या भुखंडावर मंगळवारी (दि.२६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह कांद्यासाठी वापरणाऱ्या जाळीदार गोणीत टाकून फेकून दिल्याचे आढळून आले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह गोणीतून बाहेर काढला असता सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून महिलेसोबत घातपात झाल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यालगत भुखंडावर दोन मोठ्या गोण्या काही जागरूक नागरिकांना बेवारस टाकलेल्या दिसल्या. तसेच परिसरात दुर्गंधीही जाणवत होती, यामुळे त्यांना संशय आल्याने पोलिसांना कळविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोणीतून मृतदेह काढला असता मोठी दुर्गंधी पसरली होती. ३० ते ३५ वयोगटातील महिलेच्या मृतदेहाच्या मानेभोवती फास आवळलेला असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे.
यामुळे महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घातपात करत खूनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून निर्जन ठिकाणी फेकून पोबारा केला असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय धमाळ, सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, आर. जी. घडवजे, विष्णू हळदे, देवराम चव्हाण यांच्या पथकाने धाव घेतली. यावेळी दोन गोण्या घटनास्थळी आढळून आल्या. त्यापैकी लाल जाळीदार गोणीत अनोळखी महिलेचा नग्नअवस्थेत कुजलेला मृतदेह आढळला तर दुसऱ्या पांढऱ्या गोणीत त्या महिलेचे कपडे, ताट, वाट्या, चमचे, डॉक्टरच्या उपचाराची चिठ्ठी असे साहित्य आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाचा पंचनामा करत तातडीने जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर आढळलेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी नोंद करण्याचे काम म्हसरूळ पोलिस ठाण्यात सुरू होते.