नाशिक : शहरात दि. १४ जून २०१७ रोजी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे महापालिकेच्या नालेसफाई व पावसाळी गटार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानुसार, महापौरांच्या पत्रानुसार आयुक्तांनी नालेसफाईच्या कामांची चौकशी लावली होती. परंतु, अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आणि आता पावसाळा संपत आला तरी नालेसफाईची चौकशी सुरूच आहे. अतिरिक्त आयुक्तांमार्फत कासवगतीने सुरू असलेल्या या चौकशीला लागलेला विलंब पाहता शंकाकुशंकांना मात्र उधाण आले आहे. दि. १४ जून रोजी शहरात दीड तासातच ९२ मिमी पावसाची नोंद होऊन रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे असंख्य व्यावसायिकांसह नागरिकांचे नुकसान झाले होते. याबाबतचे पडसाद दि. १९ जून रोजी झालेल्या महासभेत उमटले होते. पश्चिम प्रभाग समितीने याबाबत महासभेत लक्षवेधी मांडली होती. यावेळी सदस्यांनी नालेसफाई व पावसाळी गटार योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती व सत्ताधारी भाजपाकडून शहर अभियंत्याला पाठीशी घातले जात असल्याबद्दल विरोधी पक्षांनी टीकाही केली होती. दरम्यान, पावसाळी गटार योजनेवरून सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विरोधकांवर आरोप केल्याने गदारोळ होऊन महापौरांनी महासभा गुंडाळली होती. महापौरांच्या या निर्णयाविरुद्धही विरोधकांनी आरोप केले होते. दरम्यान, महापौरांनी नालेसफाई व पावसाळी गटार योजनेची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्याची घोषणा केली होती, परंतु नंतर घूमजाव करत आपण स्वत:च त्याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितल्याने शंका उपस्थित केल्या गेल्या. त्यामुळे महापौरांनी आयुक्तांना पत्र पाठवून नालेसफाई व पावसाळी गटार योजनेच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आपल्यावर होणाºया आरोपांना पूर्णविराम दिला. महापौरांच्या मागणीनुसार आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आता पावसाळा संपत आला तरी अद्याप नालेसफाईच्या चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर झालेला नाही. अतिरिक्त आयुक्तांकडून कासवगतीने सुरू असलेल्या या चौकशीबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नालेसफाईची चौकशी अद्याप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:48 AM