लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची स्पष्टोक्ती महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कामांत दिरंगाई करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नसल्याचे महापौरांनी ठामपणे सांगितले.गेल्या बुधवारी (दि.१४) दीड तासातच ९२ मि.मी. पावसाची नोंद होऊन शहरातील रस्तोरस्ती पाणी साचले होते. त्यामुळे अनेक घरांसह दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याबाबत सोमवारी (दि.१९) झालेल्या महासभेत पश्चिम प्रभाग समितीसह विरोधकांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर चार तास चर्चा झाली परंतु, सभागृहनेता दिनकर पाटील यांनी पावसाळी गटार योजनेबाबत मागील इतिवृत्तांचा संदर्भ देत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजर यांची थेट नावे घेत आरोप केल्याने गदारोळ उडाला होता. सत्ताधारी पक्षाचे गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी पावसाळी गटार योजनेची फेरचौकशी करण्यासह नालेसफाईच्या कामांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे महापौरांकडून या प्रश्नी निर्णय होण्याची शक्यता असतानाच विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्याने महापौरांनी सभा आटोपती घेतली होती. त्यानंतर विरोधकांनी दोषी अधिकाऱ्यांना महापौर पाठीशी घालत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली होती. त्याबाबत मंगळवारी (दि.२०) प्रत्युत्तर देताना महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांना आपण पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले. पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची स्वतंत्र समिती नियुक्त केली जाणार असून, चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सोमवारी झालेल्या महासभेत नालेसफाईबाबत शहर अभियंता उत्तम पवार यांना खुलासा करण्यास सांगितले होते, परंतु त्याचवेळी विरोधकांनी गोंधळ घातल्याने निर्णय देता आला नाही. चार तास चर्चा होऊनही विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचा वेळ वाया गेल्याचाही आरोप महापौरांनी केला. यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, उद्धव निमसे उपस्थित होते.पावसाळी गटार योजनेची चौकशी होणारचपावसाळी गटार योजनेबाबत विरोधकांनी त्या-त्यावेळी केलेल्या भाषणांबाबत आपण सभागृहाला दिलेली माहिती खरी असून, त्यावर आपण ठाम असल्याचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सांगितले. पावसाळी गटार योजनेबाबत महासभेने नियुक्त केलेली समिती अजूनही अस्तित्वात आहे. ती पुनर्जीवित करण्याची मागणी आपण महापौरांकडे केली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासनामार्फतही चौकशी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नालेसफाईच्या कामांची चौकशी
By admin | Published: June 21, 2017 12:57 AM