नाशिक : ब्रह्मगिरीवरून रविवारी निघालेली नमामि गोदा फाउंडेशनची ‘वारी गोदावरी’ सोमवारी (दि.२१) शहरात आली. शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये वारीमधील स्वयंसेवकांनी तरुणाईसोबत संवाद साधत गोदावरी विकास व संवर्धनासाठी कृती करण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी तरुणाईने उत्स्फूर्तपणे कृतिशील सहभाग घेण्याचे वचन सदस्यांना दिले. गोदा प्रदूषणमुक्ती आणि नैसर्गिक प्रवाहचा विकास या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या ‘नमामि गोदा फाउंडेशन’कडून पहिल्या टप्प्यात गोदेचे उगमस्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतापासून गोदा जल कलशासोबत ‘वारी गोदावरी’ हा उपक्रम राबविण्यात आला. ब्रह्मगिरी ते रामकुंड असा पहिला टप्पा रविवारी संध्याकाळी पूर्ण करण्यात आला.यावेळी ब्रह्मगिरी येथील गोदा जल रामकुंडात सोडण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, सुनील मेंढेकर, रोहन देशपांडे, अविनाश आव्हाड, नूपुर सावजी, अॅड. शिरीष दंदणे आदि उपस्थित होते. सकाळी सोमेश्वर मंदिरापासून वारीचा प्रवास रामकुंडाच्या दिशेने सुरू झाला. सकाळी साडेदहा वाजता वारी भोसला महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी उद्गीरकर, क्षीरसागर, पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गोदा प्रदूषणमुक्तीबाबत प्रबोधन सातत्याने झाले अन् होत आहे; मात्र गोदावरीला आता कृतीची गरज आहे, असे पटवून दिले. यावेळी तरुण-तरुणींनी फाउंडेशनसोबत कृतिशील प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. दुपारी १२ वाजता न. भ. ठाकूर विधी महाविद्यालयात वारी पोहचली. भावी वकिलांशी संवाद साधत त्यांनाही गोदा प्रदूषणमुक्तीच्या चळवळीत कृतिशील सहभागी होण्याची साद घालण्यात आली. तसेच बीवायके महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. एकूणच आज अखेरच्या दिवशी वारी गोदावरी’ला तरुणाईची साथ लाभली. यावेळी कॉलेजरोडवरील प्रिं.टी.ए.कुलकर्णी चौकामध्ये वारीचे ढोलपथकाने जोरदार स्वागत केले
‘नमामि गोदा’ला तरुणाईची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:46 AM