नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात तिकीट विक्री झाल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यावर शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी नोटा, नोटाबंदी हे त्यांचेच विषय असल्याचा टोला लगावला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्व उमेदवारांकडून दोन दोन लाख रुपये जमा केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पाठोपाठ दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याची टिप्पणी करणाराही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाशिकमध्ये आलेल्या देसाई यांनी भाजपाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या विषयावर टिप्पणी करताना त्यांनी नोटा हा भाजपाचाच विषय असल्याचे सांगितले. सध्या भाजपाला खूप काही काही सुचते आहे, राम, कृष्ण आणि महाभारत असे अनेक विषय असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी भाजपा सरकारने दबाव टाकून शिवसेनेचे अर्ज बाद केल्याच्या विषयावर बोलताना त्यांनी सरकार असले की असे केले जाते तसेच अन्य घटक प्रभावी असतात, असे नमूद केले, मात्र नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्यामागे भाजपाचे दबावतंत्र आहे, असे वाटत नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेत एबी फॉर्मचा घोळ हा गटबाजीतून झाल्याच्या तक्रारींविषयी त्यांनी इन्कार केला. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेकडे सर्वाधिक इच्छुक होते, त्यातून तांत्रिक दोष निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उमेदवारी वाटपावरून माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांनी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण केली होती. त्यावरही देसाई यांनी सारवासारव केली. सर्व प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेत गटबाजी नाही, तर सर्व गट मिळून महापालिका निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, अॅड. शिवाजी सहाणे आदि उपस्थित होते. मात्र महानगरप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)
नोटाबंदी, नोटा हे सर्व भाजपालाच माहीत
By admin | Published: February 07, 2017 12:08 AM